भाऊसाहेब हिरेंमुळेच यशवंतराव राज्याचे मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 01:56 AM2020-01-18T01:56:20+5:302020-01-18T01:57:15+5:30
स्वातंत्र्यपूर्व काळात व त्यानंतरही राज्याच्या जडणघडणीत हिरे कुटुंबीयांचे मोठे योगदान असून, स्व. भाऊसाहेब हिरे नसते तर यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री होऊ शकले नसते अशा शब्दात राष्टÑवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी पुष्पाताई हिरे यांच्या ९०व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यात हिरे कुटुंबीयांचा गौरव केला.
नाशिक : स्वातंत्र्यपूर्व काळात व त्यानंतरही राज्याच्या जडणघडणीत हिरे कुटुंबीयांचे मोठे योगदान असून, स्व. भाऊसाहेब हिरे नसते तर यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री होऊ शकले नसते अशा शब्दात राष्टÑवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी पुष्पाताई हिरे यांच्या ९०व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यात हिरे कुटुंबीयांचा गौरव केला.
राज्याच्या माजी आरोग्यमंत्री पुष्पाताई हिरे यांच्या ९०व्या वाढदिवसानिमित्त जाहीर अभीष्टचिंतन सोहळा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री विनायकदादा पाटील होते.
यावेळी बोलताना पवार यांनी, स्वातंत्र्य चळवळीत नाशिक जिल्हा अग्रस्थानी होता, त्यावेळी त्या चळवळीचे नेतृत्व स्व. भाऊसाहेब हिरे यांच्याकडे होते. स्वातंत्र्यानंतरही सामान्य माणसाला स्वातंत्र्याची अपेक्षापूर्ती करण्याचे काम त्यांनी केले. कूळकायदा असो वा शेतकऱ्यांना त्यांचे अधिकार मिळण्याचा विषय, असो भाऊसाहेब यांचे योगदान महत्त्वाचे होते. एककाळ असा होता राज्यात हिरे व यशवंतराव चव्हाण यांच्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा झडली होती. परंतु इतिहासाचे बारकाईने निरीक्षण केल्यास १९५६ साली मोरारजी देसाई यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे होते, परंतु त्यांची अविरोध निवड व्हावी अशी इच्छा होती. त्यावेळी स्व. भाऊसाहेब हिरे यांनी त्यांना विरोध केला व मतदान झाल्यास आपल्याला कमी मते मिळाली तरी चालतील, परंतु मोरारजी देसाई यांची अविरोध निवड होऊ देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली.
परिणामी देसाई यांनी माघार घेतली व त्यामुळे स्व. यशवंतराव चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली, असे सांगितले. स्व. भाऊसाहेब हिरे यांच्यानंतर व्यंकटराव व त्यानंतर पुष्पाताई हिरे यांच्यासोबत आपल्याला काम करण्याची संधी मिळाली असे सांगून पवार यांनी, पुष्पाताई हिरे यांनी लातूर भूकंप व मुंबई बॉम्बस्फोटातील जखमींची राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून केलेली सृश्रूषा कधीही विसरू शकणार नसल्याचे सांगितले.
यावेळी विनायकदादा पाटील यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अपूर्व हिरे यांनी केले.
व्यासपीठावर पुष्पाताई हिरेंसह प्रशांत हिरे, हेमंत टकले, समीर भुजबळ, अद्वय हिरे, नरेंद्र दराडे, किशोर दराडे, श्रीराम शेटे, नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे, शोभा बच्छाव, दिलीप बनकर, माधवराव पाटील, राजेंद्र डोखळे, रंजन ठाकरे, तुषार शेवाळे, रवींद्र पगार, सरोज अहिरे, बाळासाहेब क्षीरसागर आदी उपस्थित होते.
मातृतुल्य व्यक्तिमत्त्व
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पुष्पाताई हिरे या शालीन व्यक्तिमत्त्वाच्या मातृतुल्य असल्याचा उल्लेख केला. हिरे कुटुंबीयांचे महाराष्टÑातील राजकारणातील योगदान विसरता येणार नसल्याचे सांगितले. मांजरपाडा प्रकल्पाबाबत प्रास्ताविकात अपूर्व हिरे यांनी केलेल्या उल्लेखाबाबत भुजबळ म्हणाले, गुजरातकडे वाहून जाणारे राज्याचे पाणी नाशिक, नगर व मराठवाड्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जातील़ महाराष्टाचे हक्काचे पाणी मिळविण्यासाठी सत्तेचा सारा उपयोग केला जाईल, असे सांगितले.