यशवंतराव प्रतिष्ठानचा दोन लाखाचा पुरस्कार लोकहितवादी मंडळास जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 10:45 PM2020-10-22T22:45:15+5:302020-10-23T00:02:05+5:30
नाशिक : शहरातील सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकहितवादी मंडळास यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल दोन लाखाचे पारितोषिक जाहीर झाल्याची माहिती लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर विश्वस्त दिलीप साळवेकर यांनी दिली.
नाशिक : शहरातील सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकहितवादी मंडळास यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल दोन लाखाचे पारितोषिक जाहीर झाल्याची माहिती लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर विश्वस्त दिलीप साळवेकर यांनी दिली.
लोकहितवादी मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येतात. त्यात महाराष्ट्र राज्य सासंकतिक संचलनालयाच्यावतीने घेण्यात येणारी राज्य नाट्य स्पर्धा, संगीत राज्य नाट्य स्पर्धा, संस्कृत राज्य नाट्य स्पर्धा, बाल राज्य नाट्य स्पर्धा, नाट्य वाचन, कविसंमेलन, बालनाट्य शिबिर, आदिवासी पाड्यांवर विविध कार्यक्रम अशा अनेक उपक्रमांचा समावेश असतो. या सर्व कार्याची दखल घेऊन यशवंतराव प्रतिष्ठानने हे दोन लाख रुपयाचे पारितोषिक जाहिर केले आहे.
प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने राज्यस्तरीय पारितोषिक देण्यात येते. हे पारितोषिक कृषी, औधोगिक, समाज रचना किंवा व्यवस्थापन प्रशासन, सामाजिक एकात्मता विज्ञान तंत्रज्ञान, ग्रामीण विकास आर्थिक सामाजिक विकास, मराठी साहित्य संस्कृति कला - क्रीडा या क्षेत्रातील भरीव व पथदर्शी कार्य करणाऱ्या व्यक्तीस अगर संस्थेस देण्यात येते. महाराष्ट्रात साहित्य, संस्कृती व कला क्षेत्रातील रचनात्मक, प्रेरक आणि भरीव योगदानासाठी लोकहितवादी मंडळ ही एक नामवंत संस्था आहे. कवि कुलगुरू कुसुमाग्रज यांनी सन १९५० मध्ये लोकहितवादी मंडळाची स्थापना केली. मंडळाने मराठी साहित्य, भाषा, सर्व कला क्षेत्रात अत्यंत महत्वाचे नाशिकचा चेहरामोहरा बदलण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे. नाशिकमधील कलाकार, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते व या क्षेत्रातील अनेक संस्था यांना घडविण्याचे कार्य केले आहे व आजही चालू आहे. या संस्थेचे दीर्घकालीन वाइमयीन व ऐतिहासिक कार्य लक्षात घेता या कार्याची गौरवपूर्ण दखल म्हणून या वर्षीच यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक या संस्थेला देणार असल्याचे यशवंतराव प्रतिष्ठानने संस्थेला पत्रकान्वये कळविले आहे. रोख रक्कम रुपये दोन लाख व मानपत्र असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे . हे पारितोषिक यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी दिनी म्हणजेच बुधवार (२५ नोव्हेंबर) रोजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते देण्यात येईल . हा समारंभ मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्राच्या सभागृहामध्ये होईल. असे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने लोकहितवादी मंडळास पाठविलेल्या पत्रात म्हंटले आहे. संस्थेच्या या कामगिरीसाठी दिलीप साळवेकर, मुकूंद कुलकर्णी, भगवान हिरे, सुभाष पाटील यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.