भऊर येथील यात्रोस्तव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 08:33 PM2020-12-09T20:33:15+5:302020-12-10T00:32:01+5:30
देवळा : तालुक्यातील भऊर येथे दरवर्षी भरणारा दोन दिवसीय यात्रोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याचा निर्णय यात्रा कमिटी व ग्रामस्थ यांच्या बैठकीत घेण्यात आला.
देवळा : तालुक्यातील भऊर येथे दरवर्षी भरणारा दोन दिवसीय यात्रोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याचा निर्णय यात्रा कमिटी व ग्रामस्थ यांच्या बैठकीत घेण्यात आला.
ग्रामदैवत पिरबाबा यांच्या नावाने भरणारा भऊर गावातील यात्रोत्सव दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या अमावास्येला भरविण्यात येतो. चालू वर्षी दि. १४ व १५ डिसेंबर या दोन दिवशी यात्रा उत्सव साजरा होणार होता. मात्र यात्रा उत्सवासाठी नागरिक गर्दी करतील याची शक्यता लक्षात घेऊन चालू वर्षी हा उत्सव रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी (दि. ८) झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती यात्रा कमिटी अध्यक्ष सुभेदार कारभारी पवार यांनी दिली.
दि. १४ रोजी अमावास्येला साध्या पद्धतीने व मोजक्या ग्रामस्थांच्या उपस्थिती प्रथेनुसार रथ मिरवणूक काढण्यात येणार असून, यावेळी ग्रामस्थांची गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. उर्वरित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या प्रथेला पहिल्याच वेळेस खंड पडणार असला तरी हा निर्णय जनतेच्या हितासाठी घेण्यात आल्याने या निर्णयाचे सर्व ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.
यावेळी वि.का. सोसायटीचे चेअरमन काशीनाथ पवार, तंटामुक्ती अध्यक्ष नितीन पवार, उपाध्यक्ष शरद पवार, पोलीसपाटील भरत पवार, केदा पवार, दीपक पवार, दिनेश पवार, अमोल पवार, बापू गरुड इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.