यंदा रहाडातील रंग पडणार फिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:09 AM2021-03-29T04:09:24+5:302021-03-29T04:09:24+5:30
पंचवटी : नाशिकमधील रहाडीतील रंगपंचमी राज्यात ओळखली जाते. परंतु यंदा कोरोनामुळे रहाडीचा रंगोत्सव फिका होणार असून, रहाडी बंद ठेवण्याचा ...
पंचवटी : नाशिकमधील रहाडीतील रंगपंचमी राज्यात ओळखली जाते. परंतु यंदा कोरोनामुळे रहाडीचा रंगोत्सव फिका होणार असून, रहाडी बंद ठेवण्याचा निर्णय येथील मंडळांनी घेतला आहे.
होळी सणानंतर पाच दिवसांनी येणाऱ्या रंगपंचमीला शनिचौक, गाडगे महाराज पुलाजवळ असलेल्या पेशवेकालीन रहाडीत रंग खेळला जातो. मात्र यंदा देशभरात कोरोना संसर्ग वाढल्याने प्रशासनाने सर्व धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. रंगपंचमीच्या दिवशी पंचवटीत सार्वजनिक ठिकाणी व रहाडीतील रंग खेळण्यासाठी पोलीस प्रशासनाने मनाई केली आहे. येत्या शुक्रवारी रंगपंचमी उत्सव आहे. पंचवटीत दरवर्षी मोठ्या उत्साहात रंगोत्सव साजरा केला जातो. सरदार चौक व गाडगे महाराज पुलाजवळ दोन पेशवेकालीन रहाडी आहेत. रहाडीत उड्या घेण्यासाठी शहरातील रंगप्रेमी शेकडोंच्या संख्येने सहभागी होतात. सदर रहाडात दरवर्षी गुलाबी रंग बनविला जातो. रहाडात आंघोळ केल्याने त्वचारोग होत नाही तसेच उन्हाळ्यात उन्हापासून त्रास होत नाही असे मानले जाते. त्यामुळे दरवर्षी रहाडात रंग खेळण्यासाठी गर्दी होत असते.
मात्र यंदा कोरोनाचे रुग्ण वाढल्याने प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना लागू केल्या असल्याने सार्वजनिक सोहळ्यांना बंदी केली आहे. याबरोबरच संचारबंदीदेखील लागू केली आहे. रंगपंचमीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर परिसरात संचारबंदी लागू असणार आहे. पोलीस प्रशासनामार्फत रहाड परिसरात लोखंडी बॅरिकेडिंग करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
--इन्फो--
तिसऱ्यांदा रहाड बंद
शनिचौकात असलेल्या पेशवेकालीन रहाडात दरवर्षी रंगपंचमीनिमित्ताने शेकडोंच्या संख्येने रंगप्रेमी येतात. काही वर्षांपूर्वी मंडळाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याचे निधन झाल्याने तर तीन-चार वर्षांपूर्वी सर्वत्र दुष्काळाचे सावट पसरल्याने रहाड बंद होती. यंदा देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने रहाड बंद ठेवण्याचा निर्णय शनिचौक मित्रमंडळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतला आहे.
संतोष भोरे, संस्थापक अध्यक्ष, शनिचौक मित्रमंडळ