यंदा डिजिटल पर्युषण पर्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 01:11 AM2020-08-17T01:11:46+5:302020-08-17T01:12:10+5:30
ऋषिपंचमीपासून (दि. २३) जैन संवत्सरी चतुर्मासाला प्रारंभ होत असून, यंदा संपूर्ण देशात कोरोना संसर्ग वाढल्याने शासनाने धार्मिकस्थळी एकत्र येऊन कार्यक्रम करण्यासाठी परवानगी नसल्याने म्हसरूळ गजपंथसह अन्य दिगंबर जैनस्थानकात कार्यक्रम होणार नाही. मात्र, चतुर्मास सुरू झाल्यावर केवळ मोजक्या साधुमुनींच्या व भाविकांच्या उपस्थितीत मंदिरात सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत, तर दुसरीकडे दिगंबर जैन युवा महासभेच्या वतीने यंदा डिजिटल पर्युषण पर्वाची सुविधा देण्यात येणार आहे.
पंचवटी : ऋषिपंचमीपासून (दि. २३) जैन संवत्सरी चतुर्मासाला प्रारंभ होत असून, यंदा संपूर्ण देशात कोरोना संसर्ग वाढल्याने शासनाने धार्मिकस्थळी एकत्र येऊन कार्यक्रम करण्यासाठी परवानगी नसल्याने म्हसरूळ गजपंथसह अन्य दिगंबर जैनस्थानकात कार्यक्रम होणार नाही. मात्र, चतुर्मास सुरू झाल्यावर केवळ मोजक्या साधुमुनींच्या व भाविकांच्या उपस्थितीत मंदिरात सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत, तर दुसरीकडे दिगंबर जैन युवा महासभेच्या वतीने यंदा डिजिटल पर्युषण पर्वाची सुविधा देण्यात येणार आहे.
कोरोनामुळे भाविकांना झूमद्वारे चतुर्मास कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे. म्हसरूळ येथील गजपंथ मंदिरात सहा ते सात जैनमुनी असून, त्यांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सध्या गजपंथ येथे मुनीजी जयदीदी महाराज, आचार्य कुमोदनंदीजी महाराज, आचार्य रवींद्रनंदीजी महाराज हे लॉकडाऊनमुळे पाच महिन्यांपासून मंदिरात अडकून आहेत. चतुर्मास काळात विहार करता येत नसल्याने ते दिवाळीपर्यंत गजपंथ येथे थांबणार आहेत. साधुमुनी
विहार करताना जैनमंदिरात थांबतात.
गजपंथ येथे मार्च महिन्यात
मुनीजी, आचार्य थांबले होते,
मात्र त्याचदरम्यान कोरोना संसर्ग वाढला व लॉकडाऊनमुळे ते गजपंथ येथून जाऊ शकले नाहीत.
नाशिकरोड येथील जैनभवनात कोरोनामुळे पर्युषण पर्वात कोणतेही धार्मिक कार्यक्रम होणार नसल्याचे जैनस्थानकवासीयांनी सांगितले, तर सिडकोतील राणा प्रताप चौकात असलेल्या श्री वर्धमान जैनस्थानकातदेखील यंदा जाहीरपणे साधुमुनींचे प्रवचन होणार नसून, भीष्मपितामह तपस्वी रत्नगुरुदेव सुमतिप्रकाश म. सा. यांच्या शिष्या विशुद्धीजी म. सा. यांचे धार्मिक प्रवचनाचे रेकॉर्डिंग करून ते समाजबांधवांच्या सोशल मीडियावर प्रसारित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चतुर्मासात येणाऱ्या जैन मुनींबाबत भाविकांना उत्सुकता असते. त्यांचे मार्गदर्शन आणि संत सहवास हा फार मोठा ठेवा मानला जातो. मात्र, यंदा कोरोनामुळे अशा उपक्रमांवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी कार्यक्रम होणारच नसले त्यावरदेखील पर्याय शोधण्यात आले आहेत.
भारत वर्ष दिगंबर जैन युवा महासभा महाराष्ट्र प्रांतच्या पुढाकाराने हा डिजिटल पर्युषण पर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. चतुर्मास कालावधीत सलग दहा दिवस हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी नावनोंदणी सुरू असून, बाराशे भाविकांनी
नोंदणी केली आहे.