मागील वर्षीच्या तुलनेत यंदा गणेशमूर्ती महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:40 AM2019-08-28T00:40:27+5:302019-08-28T00:40:56+5:30

गणेशोत्सव आला की लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचाच उत्साह शिगेला पोहचतो. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांसोबतच घरोघरी बसविण्यात येणाऱ्या गणेशमूर्तीसाठी सगळेच जण उत्साही असतात.

 This year Ganesh idol is more expensive than last year | मागील वर्षीच्या तुलनेत यंदा गणेशमूर्ती महाग

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा गणेशमूर्ती महाग

googlenewsNext

नाशिक : गणेशोत्सव आला की लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचाच उत्साह शिगेला पोहचतो. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांसोबतच घरोघरी बसविण्यात येणाऱ्या गणेशमूर्तीसाठी सगळेच जण उत्साही असतात. त्यामुळे काही दिवस आधीच काहीजण आपल्या बाप्पाच्या मूर्तीची बुकिंग करून ठेवतात. बाजारात नवनवीन गणेशमूर्ती दाखल झाल्या असून, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी गणेशमूर्तींच्या किमतीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
शहरातील डोंगरे वसतिगृहावर गणेशमूर्ती विक्रीसाठी दुकाने सज्ज झाली आहेत. यंदा शाडूमातीच्या मूर्तींची दुकाने मोठ्या प्रमाणावर दिसून येत असले तरी पीओपीच्या गणेशमूर्तींनाही मोठी मागणी दिसून येत आहे. तसेच डेकोरेशनचे साहित्यांचे दुकानेही यावर्षी मोठ्या प्रमाणावर बघायला मिळत आहे. यावर्षी गणेशमूर्तींच्या किमतींमध्ये मागीलवर्षीच्या तुलनेत मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. मूर्तीसाठी लागणारी माती, मजुरीचा खर्च तसेच इंधन वाढीमुळे वाहतूक खर्च वाढलेला आहे तसेच पावसामुळे शाडूमाती लवकर उपलब्ध झाली नसल्यामुळेही मूर्तींच्या किमतीत वाढ झाल्याचे मूर्तीकार सांगत आहे. मूर्तीसाठी लागणारी शाडूमाती ही राजस्थान व गुजरात येथून येत असते. तसेच यावर्षी पावसामुळे माती जमा करण्यासाठी अडचण निर्माण झाल्यामुळे माती लवकर उपलब्ध होत नव्हती. पाऊस थांबल्यानंतर ही माती महाराष्टÑात येण्यास सुरुवात झाली. तसेच इंधनचे दर वाढल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढला असून मूर्ती बनविण्यासाठी लागणाºया मजुरांचा रोजदेखील वाढला आहे. मागील वर्षी या मजुरांना ८०० रुपये रोज होता तर यावर्षी हा रोज १००० ते १२०० रुपये झाल्यामुळे त्याचा परिणाम मूर्तीच्या किमतीवर झाल्याचे दिसून येत आहे.
पीओपीच्या मूर्तींना अधिक मागणी
पीओपी व शाडूमातीच्या मूर्तींच्या दरांमध्ये मोठा फरक आहे. शाडूमातीची मूर्ती बनविण्यासाठी लागणारी माती ही इतर राज्यातून मागवावी लागत असल्यामुळे त्याचा खर्च मोठा होतो. तसेच वेळेवर ही माती उपलब्ध होत नसते. त्यात शाडूमातीच्या मूर्ती बनविल्यानंतर त्या सुकण्यासाठी १० दिवसांचा कालावधी लागतो त्यामुळे यामध्ये खर्चाचे प्रमाणदेखील वाढते. याउलट पीओपीची मूर्ती एका दिवसात सुकत असल्यामुळे मूर्तीचे रंगरंगोटीचे काम त्वरित सुरू करता येते त्यामुळे या मूर्तींचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेता येते. तसेच या मूर्ती शाडूमातीच्या मूर्तीच्या तुलनेत स्वस्त मिळतात. त्यामुळे पीओपीच्या मूर्तींकडे ग्राहकांचा कल आहे.
दरवर्षाच्या तुलनेत यावर्षी सर्वच मूर्तींच्या किमतीत मोठी वाढ झालेली आहे. पूरपरिस्थितीमुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा यावर्षी झाला होता. त्यामुळे मूर्ती बनविण्यासाठी लागणारे साहित्य वेळेवर उपलब्ध होऊ शकले नाही. त्यात यावर्षी मजुरांची कमतरता असल्यामुळे त्यांची मजुरीदेखील वाढलेली आहे. तसेच शाडूमातीपेक्षा पीओपीच्या गणेशमूर्तींचा खप खूप आहे.
- योगेश टिळे, मूर्तिकार, नाशिक
असे आहे मूर्तींचे दर
शाडूमातीच्या छोट्या मूर्तीलाही मोठा दर असल्यामुळे ग्राहक पीओपीच्या मूर्ती खरेदी करण्यातच समाधान मानत आहे. यावर्षी शाडूमातीच्या मूर्तीचे दर हे ५५१ ते ३१०० रुपयांपर्यंत आहे. तेच पीओपीच्या मूर्तीचा दर हा केवळ १०० रुपयांपासून पुढे सुरू आहे.

Web Title:  This year Ganesh idol is more expensive than last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.