यंदा दीडशे टक्के पाऊस; जुन्या रस्त्यांची धूळधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:06 AM2017-09-30T00:06:58+5:302017-09-30T00:07:03+5:30
पावसाचे दिवस अधिक : पालिकेकडून रस्त्यांचे सर्वेक्षण सुरू नाशिक : शहरात पावसाची वार्षिक सरासरी असते सुमारे ७०० मि.मी. परंतु, यंदा चार महिन्यांत पाऊस पडला १०८४ मि.मी. सरासरी दीडशे टक्के पाऊस आणि त्यातही पावसाचे दिवस अधिक असल्याने त्याचा परिणाम शहरातील पाच ते दहा वर्षांपूर्वी तयार केलेल्या रस्त्यांवर झाला असून, ठिकठिकाणी खड्डे पडून धूळधाण झाली आहे. आता महापालिकेने अशा रस्त्यांची सर्वेक्षण मोहीम हाती घेतली असून, दिवाळीनंतर रस्त्यांच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.
पावसाचे दिवस अधिक : पालिकेकडून रस्त्यांचे सर्वेक्षण सुरू
नाशिक : शहरात पावसाची वार्षिक सरासरी असते सुमारे ७०० मि.मी. परंतु, यंदा चार महिन्यांत पाऊस पडला १०८४ मि.मी. सरासरी दीडशे टक्के पाऊस आणि त्यातही पावसाचे दिवस अधिक असल्याने त्याचा परिणाम शहरातील पाच ते दहा वर्षांपूर्वी तयार केलेल्या रस्त्यांवर झाला असून, ठिकठिकाणी खड्डे पडून धूळधाण झाली आहे. आता महापालिकेने अशा रस्त्यांची सर्वेक्षण मोहीम हाती घेतली असून, दिवाळीनंतर रस्त्यांच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.
दरवर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची दुरवस्था होत आली आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर महापालिकेमार्फत लगोलग तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यांची डागडुजीही केली जाते. सर्वसाधारणपणे नाशिक शहरात पावसाळ्यात सुमारे ७०० मि.मी. पाऊस पडतो आणि गोदावरी नदीला फार तर दोन किंवा तीनदा पूर येतो. यंदा मात्र, १ जून ते २९ सप्टेंबर २०१७ या कालावधीत १०८४ मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. म्हणजेच सरासरी दीडशे ते पावणेदोनशे टक्के पाऊस झाला आहे. शिवाय, यंदा फार कमी दिवस पावसाने उघडीप दिली असून, गोदावरी नदीलाही यंदा सुमारे सहा ते सात वेळा पूर येऊन गेला आहे. पावसाचे दिवस अधिक असल्याने यंदा त्याचा सर्वाधिक फटका पाच ते दहा वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या रस्त्यांना बसल्याचा दावा महापालिकेचे शहर अभियंता उत्तम पवार यांनी केला आहे. अशा रस्त्यांचे प्रभागनिहाय सर्वेक्षण आता महापालिकेने सुरू केले आहे. या सर्वेक्षणात ज्याठिकाणी ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी, केबल टाकण्यासाठी अथवा पाणीपुरवठ्याची लाइन टाकण्यासाठी रस्ते खोदले असतील, त्यांचीही नोंद घेतली जाणार आहे.रस्ता दुरुस्ती ठेकेदारामार्फत
तीन वर्षांच्या आतील ज्या रस्त्यांची दुरवस्था झालेली असेल, त्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदाराचीच आहे. महापालिकेकडून संबंधित ठेकेदारांकडून सदर रस्त्यांची कामे करून घेतली जातील, असे शहर अभियंता उत्तम पवार यांनी सांगितले. पावसाळा संपल्यानंतर शहरातील रस्त्यांची कामे हाती घेतली जातील. सततच्या पावसामुळे यंदा खड्डे बुजविण्यात अडथळे आले.