वर्षभरात एकही रुग्ण ना तपासला, ना केली शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 01:14 AM2019-01-18T01:14:41+5:302019-01-18T01:15:31+5:30
डॉक्टरांचे काम काय तर रुग्ण तपासणी आणि शस्त्रक्रिया करणे, परंतु महापालिकेत अनेक डॉक्टरांनी वर्षभरात एक रुग्ण तपासला नाही की स्त्री रोगतज्ज्ञाने प्रसूती केली नाही. आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मागविलेल्या माहितीत हा धक्कादायक प्रकार उघड झाला. यापार्श्वभूमीवर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संबंधितांच्या कामकाजाचे आॅडिट करताना संबंधितांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे.
नाशिक : डॉक्टरांचे काम काय तर रुग्ण तपासणी आणि शस्त्रक्रिया करणे, परंतु महापालिकेत अनेक डॉक्टरांनी वर्षभरात एक रुग्ण तपासला नाही की स्त्री रोगतज्ज्ञाने प्रसूती केली नाही. आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मागविलेल्या माहितीत हा धक्कादायक प्रकार उघड झाला. यापार्श्वभूमीवर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संबंधितांच्या कामकाजाचे आॅडिट करताना संबंधितांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे.
महापालिकेच्या रुग्णालयातील गैरकारभार गेल्या काही महिन्यांपासून गाजत असून, त्यात गटबाजीने कहर केला आहे. एमबीबीएस-बीएएमएस, एमडी अशा शिक्षणाच्या पदवीवरून वरिष्ठ-कनिष्ठ वाद सुरू झाला आहे, त्यातच प्रस्थापित डॉक्टर जागेवर नसतात. कनिष्ठ आणि नवख्या कर्मचाऱ्यांना जादा काम देणे, रात्रपाळीस नेमणे यांसारखे प्रकार होत असल्याने महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांचीच आबाळ होत आहे. नगरसेवकांना हाताशी धरून सोयीच्या ठिकाणी काम करणे यांसह अनेक प्रकार घडत आहेत. शासनाकडून आरोग्य सेवेसाठी अनेक योजना असताना त्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. त्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाकडे सातत्याने तक्रारी होत आहेत. त्याची दखल घेत आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गुरुवारी (दि. १८) अधिकाºयांची बैठक घेतली.
यावेळी आयुक्तांनी मागविलेल्या माहितीनुसार काही रुग्णालयातील प्रमुख असलेल्या वैद्यकीय अधिकाºयांनी वर्षभरात एकही बाह्य रुग्ण तपासला नाही की स्त्रीरोगतज्ज्ञ असलेल्या वैद्यकीय अधिकाºयाने महिलेची तपासणी किंवा प्रसूतीही केलेली नाही. याचा अर्थ संबंधित डॉक्टर खासगी उपचार करीत असल्याचे आरोप केले तर ते कसे नाकारता येतील? असा प्रश्नच आयुक्तांनी उपस्थित केला. उपकरणे असूनदेखील त्याचा वापर होत नसल्याबद्दलही आयुक्तांनी संंबंधित डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिले. बिटको रुग्णालयात रुग्णांचा ताण अधिक आहे, परंतु त्याठिकाणी डॉक्टरांची संख्या कमी आहे. हे मान्य करीत आयुक्तांनी त्याठिकाणी वाढीव डॉक्टर नियुक्त करण्याचे मान्य केले. महापालिकेने अलीकडेच २७ डॉक्टर भरतीसाठी प्रक्रिया राबविली होती. त्यातील २३ डॉक्टरांनी रुजू होण्याची तयारी दर्शविली असल्याने त्यांना नियुक्तिपत्रे देण्यात आली आहेत. त्यातील चार डॉक्टर बिटको रुग्णालयात नियुक्त असल्याने ताण कमी होईल, असे आयुक्तांनी सांगितले. त्यातल्या त्यात केवळ मोरवाडी येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात चांगली कामगिरी असून, येथील वैद्यकीय अधिकाºयांनीदेखील रुग्ण तपासणी तसेच शस्त्रक्रिया अशी कामे केली आहेत. विशेष म्हणजे महापालिकेकडे परिचारिकांसह अन्य कर्मचाºयांची संख्या अन्य खासगी किंवा सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत जास्त असतानाही त्या तुलनेत सेवा दिली जात नाही. आयुक्त गमे यांनी समजुतीच्या स्वरात संबंधितांना समजावले असले तरी नंतर मात्र करवाई होण्याची शक्यता असल्याची शक्यता प्रशासकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे.
तीन वैद्यकीय अधिकाºयांची दांडी
आयुक्तांनी अशाप्रकारची बैठक प्रथमच बोलवली असताना तीन प्रमुख रुग्णीलयांचेच अधिकारी गैरहजर होते. विशेष म्हणजे सध्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल गायकवाड यांनी संबंधित आपल्या सांगून गैरहजर आहेत, असे सांगितले. तथापि, अन्य उपस्थित डॉक्टरांनी मात्र अशाप्रकारे आयुक्तांच्या बैठकीत गैरहजर राहण्याबाबत कशी काय संमती दिली जाऊ शकते? असा प्रश्न करीत नाराजी व्यक्त केली.