यंदा फटाके फोडण्याचे प्रमाण घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 11:59 PM2017-10-25T23:59:23+5:302017-10-26T00:29:10+5:30
पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या जनजागृतीचा सकारात्मक परिणाम यंदाच्या दीपोत्सवात बघायला मिळाला असून, यंदाच्या दिवाळीत आवाजाचे आणि रोषणाईचे फटाके फुटण्याचे प्रमाण निम्म्यापेक्षाही कमी झाल्याचे दिसून आले.
नाशिक : पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या जनजागृतीचा सकारात्मक परिणाम यंदाच्या दीपोत्सवात बघायला मिळाला असून, यंदाच्या दिवाळीत आवाजाचे आणि रोषणाईचे फटाके फुटण्याचे प्रमाण निम्म्यापेक्षाही कमी झाल्याचे दिसून आले. दिवाळीच्या कालावधीत फटाक्यांच्या आवाजाच्या तीव्रतेचे मोजमाप करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे ‘नॉइज मीटर’च्या सहाय्याने शहरात ठिकठिकाणी ध्वनी पातळी मोजण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. दिवाळीच्या तीन दिवसांऐवजी केवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच नागरिकांनी फटाके फोडल्याने इतर दिवशी त्या तुलनेत प्रदूषणाचे प्रमाण कमी होते. यावर्षी शासन आदेश, पोलीस , प्रशासन आणि फटाके विक्रेत्यांमधील घोळामुळे स्टॉल उभारण्याची प्रक्रिया वसुबारसपर्यंत लांबल्याने याचादेखील परिणाम फटाके विक्रीवर झाला होता. शहरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना फटाके न फोडता पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची देण्यात आलेली सामूहिक शपथ आणि माध्यमातून पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने करण्यात येणारी जनजागृती या पार्श्वभूमीवरदेखील नाशिककरांनी फटाके खरेदीसाठी विशेष उत्साह दाखवला नाही. अनेक नागरिकांनी केवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फोडण्यासाठी फटाके घेतले तर अनेकांनी फटाक्यांची माळ, बॉम्ब, रॉकेट न घेता केवळ भुईचक्र, झाड असे केवळ रोषणाईचेच फटाके घेतल्याने फटाके खरेदीचा खर्च दरवर्षीच्या तुलनेत कमी झाला.