यंदा २८ हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाच्या लागवडीचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:11 AM2021-05-28T04:11:55+5:302021-05-28T04:11:55+5:30
घोटी : पावसाचे माहेरघर व भात उत्पादनात अग्रेसर असलेला इगतपुरी तालुक्यातील शेतकरी वर्गाने आपले लक्ष खरिपाच्या पिकाकडे केंद्रित ...
घोटी : पावसाचे माहेरघर व भात उत्पादनात अग्रेसर असलेला इगतपुरी तालुक्यातील शेतकरी वर्गाने आपले लक्ष खरिपाच्या पिकाकडे केंद्रित केले आहे. दर्जेदार बियाणे, खते खरेदी करण्यापासून ते कृषी विभागाशी सल्ला घेण्यापर्यंत शेतकरी व्यस्त आहेत. यावर्षी तालुक्यात एकूण ३५,३०७ हेक्टरपैकी जवळपास ३१ हजार हेक्टर शेतीवर खरिपाच्या पिकाचे नियोजन व उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यात सर्वाधिक जवळपास २८ हजार हेक्टर शेतीत भात पिकाचे उद्दिष्ट ठेण्यात आले आहे.
तालुक्यात उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस होत असतो. त्यामुळे या तालुक्यात भात पिकाचे मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, भात पिकाबरोबरच डोंगराळ व पावसाचे प्रमाण कमी असलेल्या भागात नागली, वरई, तेलबिया, भुईमूग खुरासनी, सोयाबीन, मका, अशी पिकेही घेतली जातात. यावर्षीही पावसाने प्रमाण तुलनेने कमी व डोंगराळ भाग असलेल्या प्रामुख्याने पूर्व भागात मका, नागली, सोयाबीन, खुरासनी, भुईमूग, कडधान्य यांचेही या खरीप हंगामात काही प्रमाणात लागवड केली जाणार आहे.
गतवर्षी तालुक्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व उत्पादन घटून पिकांचा दर्जाही घसरल्याने शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागले. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असला तरी रबी पिके व भाजीपाला बागायत करून कसर भरून काढण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्नही फसला, दरमहा पडणारा अवकाळी पाऊस, गारपीट, त्यातही लॉकडाऊनचे संकट, भाजीपाला मार्केटही नाही आणि भावही नाही. त्यामुळे हे वर्ष शेतकऱ्यांसाठी हानिकारकच गेले. अशाही स्थितीत नवी आशा नवी उमेद घेऊन शेतकरी बांधव पुन्हा एकदा खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. नवनवीन जातींची, नवीन वाणांची बियाणे, खते, खरेदीसाठी लगबग सुरू आहे.
--------------------------------
भात क्षेत्राचे उद्दिष्ट वाढ
इगतपुरी तालुक्यात सर्वसाधारणपणे ३५ हजार ३०७ हेक्टर क्षेत्र असून, त्यात यावर्षी जवळपास २८,००० हेक्टर क्षेत्रात भात लागवडीचे उद्दिष्ट आहे. नागली पिकासाठी यावर्षी तालुक्यात ९१७ हेक्टर उद्दिष्ट आहे, तसेच ९११ हेक्टरवर सोयाबीनचे उद्दिष्ट आहे, तर ६०० हेक्टर शेतात खुरासनीचे उद्दिष्ट आहे. १२२ हेक्टरवर मका, तर अंदाजे ३६८ हेक्टरवर भुईमूग घेण्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे, तसेच १९० हेक्टर जमिनीवर कडधान्ये घेतली जाणार आहेत.
------------------------------------
इगतपुरी तालुक्यात यावर्षीही पावसाचा अंदाज दिलासादायक सांगितला असल्याने शेतकऱ्यांकडून खते, बियाणे खरेदी सुरू झाली आहे. शेतकरी बांधवांनी बियाणे, खते, खरेदीसाठी गर्दी करू नये. शेतकऱ्यांनी शासन नियमांचे पालन करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी खते, बियाणे खरेदी करताना रीतसर पावती घ्यावी.
शीतलकुमार तवर, तालुका कृषी अधिकारी, इगतपुरी
---------------------------