यंदा फक्त १ लाख ६९ हजार मूर्तींचे दान लक्षणिय घट: पर्यावरण जागृतीमुळे संकलन घटल्याचा मनपाचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 03:51 PM2017-09-06T15:51:06+5:302017-09-06T15:51:23+5:30
नाशिक- नाशिकमध्ये पर्यावरणस्नेही गणेशोत्सवांतर्गत गत वेळी २ लाख ३९ हजार गणेश मूर्तींचे दान स्विकारणाºया महापालिकेला यंदा फक्त १ लाख ३९ हजार मुर्तींचे दान मिळाले आहे. तथापि, नागरीकांमध्ये पर्यावरण विषयक जागृती झाल्याने या वर्षी मोठ्या प्रमाणात शाडू मातीच्या मूर्ती बसविण्यात आल्या या व अन्य मूर्तींची घरोघरी तसेच कृत्रिम तलावात निर्गत केल्याने संख्या घटली असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
नाशिक मध्ये १९९७ मध्ये महाराष्टÑ अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या वतीने विसर्जित मूर्तींचे दान प्रायोगिक तत्वावर स्विकारण्यास सुरूवात केली. पुढे गोदावरी नदीसह अन्य नद्यांचे प्रदुषण टाळण्यासाठी महापालिका त्यात सहभागी झाली. यानंतर अन्य संस्थाही सहभागी झाल्याने सातत्याने मूर्ती आणि निर्माल्य संकलनात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी २ लाख ३९ हजार मूर्तींचे संकलन करण्यात आले होते. त्यामुळे यंदा त्यापेक्षा अधिक संकलन होईल आणि मूर्ती संकलनाचा विक्रम प्रस्थापित होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. महापालिकेच्या बरोबरच विविध सेवाभावी संस्थांनी देखील यासंदर्भात आवाहन तर केलेच शिवाय मूर्ती विसर्जन स्थळांच्या ठिकाणी तसे मूर्ती स्विकृती केंद्रे उभारली होती. महापालिकेने २६ नैसर्गिक विसर्जन केंद्राच्या ठिकाणी मूर्तीदान स्विकारण्याची व्यवस्था केली होती. त्याच बरोबर २८ ठिकाणी कृत्रिम कुंडे तयार केली होती. नागरीकांच्या इच्छेनुसार कृत्रिम कुंडात विसर्जन करण्याची अथवा मूर्ती दानाची सोय करण्यात आली होती. प्रत्येक ठिकाणी महापालिकेचे दहा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. शिवाय, स्वंयसेवी संस्थांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. मात्र प्रत्यक्षात सहा विभाग मिळून १ लाख ६९ हजार ९५७ मूर्ती संकलीत करण्यात आल्या आहेत. मूर्ती संकलन घटण्यामागे महापालिकेने विविध कारणे दिली असून यंदा नागरीक पर्यावरण स्नेही झाल्यानेच शाडु मातीच्या मूर्तींचा वापर अधिक झाला, तसेच नागरीकांनी नदीपात्राशिवाय घरच्या घरी विसर्जन केले असा दावा करण्यात आला आहे. याशिवाय निर्माल्य संकलनातही घट झाली आहे. यंदा १३१.६ टन निर्माल्य संकलीत करण्यात आले आहे. गेल्या वर्षी १६९ टन निर्माल्य संकलीत करण्यात आले होते.