यावर्षीही गणवेशाविनाच सुरू होणार शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:52 AM2019-06-17T00:52:22+5:302019-06-17T00:52:48+5:30
राज्य सरकारने गेल्यावर्षी शाळेत होणारे गणवेश वाटप बंद करून त्याकरिता डीबीटी पद्धत सुरू केली. मात्र या योजनेत अनेक तांत्रिक अडचणी आल्याने शाळेच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध होऊ शकला नव्हता.
नाशिक : राज्य सरकारने गेल्यावर्षी शाळेत होणारे गणवेश वाटप बंद करून त्याकरिता डीबीटी पद्धत सुरू केली. मात्र या योजनेत अनेक तांत्रिक अडचणी आल्याने शाळेच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध होऊ शकला नव्हता. त्यामुळे यावर्षी शासनाने डीबीटीला फाटा देत यंत्रणेतील अडचणी दूर करण्यासाठी पुन्हा महापालिके च्या माध्यमातून शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश पुरवठ्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर सोपविली आहे. परंतु, निधी मिळण्यास विलंब झाल्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षातही गेल्या वर्षाप्रमाणेच यावर्षी विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेशाविनाच शाळेत जावे लागणार आहे.
नाशिक महापालिकेच्या शहरात एकूण ९० शाळा असून, अनुदानित ८१ शाळा आहेत. यातील महापालिकेच्या सर्व शाळांमधील सर्व मुलींसह अनुसूचित जाती, जमाती व दारिद्र्य रेषेखालील सर्व मुलांना शासनाकडून गणवेशाचा पुरवठा केला जातो. तर उर्वरित विद्यार्थ्यांना नाशिक महानगरपालिकेकडून गणवेश उपलब्ध करून दिले जातात.
मात्र यावर्षी विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदीसंदर्भात शासनाचा निर्णय होण्यास विलंब झाला असून, महापालिकेलाही निधी विलंबाने प्राप्त झाल्यामुळे आतापर्यंत शासकीय योजनेतून गणवेश प्राप्त होऊ शकलेले नाही. तर उर्वरित विद्यार्थ्यांसाठी महापालिकेकडूनही तरतूद झालेली नसल्याने पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेशाविनाच शाळेत जावे लागणार आहे.
दरम्यान, महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय शाळांना शिक्षण विभागाकडून सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून पाठ्यपुस्तके प्राप्त झाली असून, सर्व विद्यार्थ्यांना शालेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार असल्याचे महापालिकेचे शिक्षण अधिकारी देवीदास महाजन यांनी सांगितले.
शासनाकडून १ कोटी ४० लाखांचा निधी
महापालिकेच्या शाळांमधील सर्व पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देण्यासाठी १ कोटी ४० लाख रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर झाला आहे. तर उर्वरित विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी महापालिकेकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, या माध्यमातून शहरातील सुमारे २७ हजार विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश मिळणार आहे. मात्र, गणवेश पुरवठ्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर सोपविली जाणार असल्याने यावर्षीही विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळण्याची शक्यता धूसर झाली असून, विद्यार्थ्यांना नवीन गणवेश मिळण्यासाठी किमान पंधरा दिवस ते एक महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.