यंदा जायकवाडीला पाणी नाही
By admin | Published: October 26, 2016 12:56 AM2016-10-26T00:56:14+5:302016-10-26T00:58:25+5:30
महामंडळाचा निर्णय : ऊर्ध्व भागातील नागरिकांना दिलासा
नाशिक : सध्या जायकवाडी धरणात ८८.७८ टक्के इतका पाणी साठा शिल्लक असल्याने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निवाड्यानुसार धरणात ६५ टक्क्यापेक्षा अधिक पाणीसाठा असल्यामुळे पैठण म्हणजेच जायकवाडी धरणाच्या ऊर्ध्व भागातील धरण समूहातून २०१६ यावर्षी पाणी सोडण्याची आवश्यकता नसल्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने घेतला आहे. महामंडळाच्या या निर्णयाने नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, दारणा, पालखेड व नगर जिल्ह्यातील मुळा, प्रवरातील पाणी स्थानिकांसाठीच राखीव तर राहीलच शिवाय पाण्यावरून होणारा नगर-नाशिक-मराठवाडा हा वादही संपुष्टात आला आहे. गेल्या वर्षी गंगापूर धरणासह मुळा धरणातून मराठवाड्याला पाणी सोडण्याचा मुद्दा राज्यभर चर्चेत आला होता. मुळातच जायकवाडीच्या उर्ध्व धरणांमध्ये पाण्याचा जेमतेम साठा शिल्लक असताना समन्यायी पाणीवाटपाचा मुद्दा
पुढे करून महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशान्वये गंगापूर धरणातून पाणी सोडण्याची कृती करण्यात आली होती. जिल्ह्यातील शेतकरी पाणी आवर्तनासाठी आंदोलन करीत असताना त्यांना डावलून दुसरीकडे मराठवाड्याला पाणी सोडण्यात आल्याने नाशिकमध्ये मोठे जनआंदोलन उभे राहिले. त्यातूनच हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालय व राज्य विधी मंडळाच्या अधिवेशनातही प्रचंड गाजले होते. यंदा मात्र राज्यात सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जायकवाडी धरणाच्या साठ्यात वाढ झाली, त्यात नाशिकच्या गंगापूरसह पालखेड, दारणा या धरणातून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडून देण्यात आल्याने त्याचा लाभ साहजिकच जायकवाडी धरणाला झाला. गोदावरी खोऱ्यातील जलाशयांमधील पाण्याचे नियोजन करण्यासंदर्भात महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशान्वये समन्यायी पाणीवाटप करण्यासंदर्भात १७ आॅक्टोबर रोजी गोदावरी मराठावाडा पाटबंधारे विकास महामंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत खरिपातील पाणी वाटपासह पाणीसाठा अहवालाची आकडेवारी सादर करण्यात आली. त्यात जायकवाडी प्रकल्पाच्या पैठण धरणामध्ये १५आॅक्टोबरपर्यंत खरीप पाणी वापरासह एकूण उपलब्ध झालेले पाणी १९२७.३४८ दशलक्ष घनमीटर आहे. त्याची उपयुक्तता ८८.७८ टक्के इतकी असल्याने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निवाड्यातील कलम १० (इ) नुसार समन्यायी पाणी वाटपाची प्रक्रिया राबविण्याकरिता पैठण धरणाच्या उर्ध्व भागातील धरण समूहातून पैठण धरणासाठी पाणी सोडण्याची आवश्यकता नसल्याचा निर्णय घेण्यात आला. तसा आदेश महामंडळाचे कार्यकारी संचालक च. आ. बिराजदार यांनी काढला आहे.
उर्ध्व धरणातील उपयुक्त पाणी स्थिती
* मुळा - ६१७.५८ दशलक्ष घनमीटर
* प्रवरा - ५६३.४७ दशलक्ष घनमीटर
* गंगापूर - २५४.४९ दशलक्ष घनमीटर
* दारणा - ५०१.४३ दशलक्ष घनमीटर
* पालखेड - ३२५.७०० दशलक्ष घनमीटर
* जायकवाडी - १७९३.४९ दशलक्ष घनमीटर
विरोधकांचा मुद्दा गायब
गेल्या वर्षी गंगापूर धरणातून मराठवाड्याला पाणी सोडण्यात आल्याने सत्ताधारी शिवसेनेसह सर्वच विरोधीपक्षांनी भाजपाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. आगामी नाशिक महापालिकेची निवडणूक लक्षात घेऊन नाशिकचे पाणी पळविण्याचा दोष भाजपाच्या माथी फोडून त्याचे राजकीय भांडवल करण्याची तयारीही विरोधकांनी चालविली होती, परंतु तत्पूर्वीच धरणांमधून पाणी न सोडण्याचा निर्णय घेऊन भाजपाने विरोधकांची तोंडे बंद करून टाकली आहेत.