यंदा शेतीची मशागत संथच
By admin | Published: May 19, 2017 12:40 AM2017-05-19T00:40:51+5:302017-05-19T00:41:14+5:30
बळीराजा धजावेना : शेतमालाला भाव मिळत नसल्याचा परिणाम
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : कधी पावसाची अनिश्चितता, तर पाऊस पडल्यानंतर शेतमालाला भाव मिळत नाही. कधी बेमोसमी, तर कधी गारपीट अशा एक ना अनेक कारणांमुळे गेल्या काही वर्षांपासून शेती उत्पादनपासून मिळणारे सरासरी उत्पन्न खालावल्याने हाती पैसाच उरत नाही. अस्मानी व सुलतानी संकटाने शेतकरी हतबल झाला आहे. शेतीची मशागत, बी-बियाणे खरेदीसाठी पुन्हा सोसायट्या, सावकारांकडे पदर पसरावा लागत आहे. या प्रयत्नालाही फारसे यश मिळत नसल्याने शेत मशागतीचा वेग संथ झाल्याचे दिसून येत आहे.
नैसर्गिक आपत्ती आणि शेतमालाच्या नेहमीच घसरणाऱ्या भावामुळे शेतकरी पिचला आहे. गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांच्या परिस्थितीत काडीचीही सुधारणा झाली नसून, नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण मात्र वाढले आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांचे नुकसानच झाल्याचे चित्र आहे. आधी दुष्काळ, त्यानंतर अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे सरासरी उत्पादन घसरले आहे.
शेतकऱ्यांच्या हातात पैसाच शिल्लक नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुला-मुलींचे लग्न यामुळे त्यांच्यावरील कर्जाचा डोंगर वाढत आहे. पावसाळा जवळ आला असतानाही शेतात शेतकऱ्यांची वर्दळ फारशी दिसून येत नाही. उन्हाळ्याच्या तडाख्यात शेतजमीन तापावी यासाठी शेतकरी एप्रिल-मे मध्येच नांगरणीच्या कामांनी शेतीच्या मशागतीला सुरवात करतो. पण यंदा मे उलटून चालला तरी शेतात बैलांच्या गळ्यातील घुंगरु ऐकू येईनासे झाले आहे, तर ट्रॅक्टरचाही आवाज मंदावल्याचे चित्र आहे.