यंदाची गुरुपौर्णिमा साजरी होणार घरीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 10:56 PM2020-07-04T22:56:15+5:302020-07-04T23:10:53+5:30
नाशिक : भारतीय संस्कृतीत गुरुला साक्षात परमेश्वर मानले जाते. रविवारी (दि.५) गुरुपौर्णिमा असून, दरवर्षी गुरुपौर्णिमेचा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदा मात्र सर्व सण उत्सव कोरोनाचे सावट असल्याने सर्व भाविक आणि शिष्य परिवार घरीच गुरुपौर्णिमा साजरी करणार आहेत, तर काही धार्मिक संस्थांच्या वतीने व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून गुरुजनांच्या आॅनलाइन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

शहरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यंदा आषाढ शुद्ध पौर्णिमेला साजरा होणारा गुरुपौर्णिमा सोहळा सार्वजनिकरीत्या साजरा होणार नाही. त्यात अनेक ठिकाणी मंदिरे, धार्मिक आश्रम, आध्यात्मिक सेवा केंद्र बंद असल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून केवळ चार ते पाच भाविकांच्या उपस्थितीत गुरूपूजन सोहळा व अभिषेक आदी कार्यक्र म होणार आहेत.
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने दिंडोरी व त्र्यंबकेश्वर येथील प्रमुख केंद्रात गुरूपूजन सोहळा होणार असून, याठिकाणी मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. तसेच भाविकांची सेवा केंद्रांमध्ये येण्याऐवजी घरीच श्री स्वामी समर्थ मंत्र जप करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज महायोग ट्रस्टच्या वतीने गंगापूररोडवरील केंद्रात प्रातिनिधिक स्वरूपात गुरूपूजन सोहळा होणार असल्याची माहिती ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त प्रकाशराव प्रभुणे यांनी दिली. यंदा गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा होणार नसून घरीच हरिनामाचा जप करावा, असे वारकरी महामंडळाचे जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब आहेत आणि कैलास महाराज घुगे यांनी केले आहे. गुरु पौर्णिमेला रविवारी
(दि ५) चंद्रग्रहण असून, हे ग्रहण नेहमीच्या ग्रहणाप्रमाणे नाही. हे छायाकल्प ग्रहण असल्याने या ग्रहणाचे वेध व इतर कोणतेही नियम कोणीही पाळू नयेत, त्यामुळे नेहमीप्रमाणे सर्व व्यवहार तसेच गुरु पौर्णिमेला पूजा, अर्चा, कुळधर्म, कुळाचार करण्यास कोणतीही अडचण नाही.
- मोहनराव दाते, पंचांगकर्ते