यंदाच्या दिवाळीला शहरात ठिकठिकाणी सुरेल मेजवानी
By admin | Published: October 30, 2016 12:38 AM2016-10-30T00:38:14+5:302016-10-30T00:39:59+5:30
अनोखी भेट : पाडवा पहाट, सांज पाडव्यानिमित्त नामवंत गायकांची हजेरी
नाशिक : दिवाळी म्हणजे फटाके, नवीन कपडे, खुसखुशीत खमंग फराळाचे पदार्थ, वैविध्यपूर्ण दिवाळी अंक, रांगोळ्या, पणत्या-आकाशकंदिलांसह दिव्यांची रोषणाई असे सारे डोळ्यासमोर येत असले तरी दिवाळीनिमित्त भल्या पहाटे उठून, शुचिर्भूत होऊन सुरेल मैफल ऐकणे ही प्रथाही गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याकडे पहायला मिळते. प्रसन्न पहाट, दिवाळीतला मंगलमय दिवस, आपल्या गायनाद्वारे रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गायकांचे संगीत ऐकण्याची संधी असे सारे योग या पडवा पहाटमध्ये जुळून येतात. त्यामुळे कितीही थंडी असली तरी रसिक श्रोते पाडवा पहाट चुकविण्यास तयार नसतात. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे असेल कदाचित पण यंदा नाशिककरांना दिवाळीनिमित्त अशा सुरेल मैफली ऐकण्याची संधी मिळणार आहे. यानिमित्ताने नामवंत गायक, वादक, कलाकारांकडून मनोरंजनाची एकाहून एक सरस कार्यक्रम नाशिककरांना अनुभवता येणार आहे.
सायली संजीवची प्रकट मुलाखत
प्रभाग ५३ मध्ये सोमवार दि.३१ आॅक्टोबर रोजी पाडवा पहाटचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे साडेपाच वाजता राणेनगरमधील शारदा शाळेसमोरील मैदानात गायक संजय गिते यांची गीतयात्रा मैफल होणार आहे. गीता माळी व निशाद गिते यांच्या स्वरात रसिकांना भाव आणि भक्तिगीतांची मेजवानी मिळणार आहे. याशिवाय ‘काहे दिया परदेस’फेम अभिनेत्री सायली संजीव हिची प्रकट मुलाखत होणार आहे.
रागिणी कामतीकर यांची मैफल
४स्वराजित संस्थेतर्फे ३१ आॅक्टोबर रोजी ५.३० वाजता गायिका रागिणी कामतीकर यांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. सुमधुर भक्तिगीते, भावगीते ऐकण्याची संधी नाशिककरांना महात्मानगर येथील गणपती मंदिर परिसरात घेता येणार आहे.
अर्शद अली खॉँ यांची मैफल
पिंपळपारावरच्या पाडवा पहाटेत यंदा ३१ आॅक्टोबर रोजी किराणा घराण्याचे अर्शद अली खॉँ यांची मैफल रंगणार आहे. संस्कृती नाशिकच्या वतीने या मैफलीचे आयोजन करण्यात आले असून, नामवंत गायकांची परंपरा यंदाही कायम राखण्यात आली आहे.