येवल्यात ‘रंगयुद्धाने’ वेधले लक्ष !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:10 AM2018-03-09T00:10:26+5:302018-03-09T00:10:26+5:30
येवला : सात हजार जनसमुदायाच्या साक्षीने रंगांचा वर्षाव करीत इंद्रधनुष्य अवतरल्याचा अनुभव येवलेकरांसह गावोगावच्या पाहुण्यांनी येवल्यात घेतला.
येवला : येवल्यातील टिळक मैदान आणि डी.जे. रोडवरील जमलेल्या सुमारे सात हजार जनसमुदायाच्या साक्षीने दुतर्फा ट्रॅक्टरवरील पिंपातून परस्परांवर रंगांचा वर्षाव करीत दोन्हीही सामन्यात इंद्रधनुष्य अवतरल्याचा अनुभव येवलेकरांसह गावोगावच्या पाहुण्यांनी येवल्यात घेतला. रंगपंचमीनिमित्त सारे शहर रंगात न्हाऊन निघाले. चौकाचौकात डीजे व ध्वनिक्षेपकावर सुरात सूर मिळवून युवक रंगांची उधळण करीत होते. सायंकाळी पाचनंतर मैदानात रंगांचे सामने रंगले. दोन्ही बाजूने प्रत्येकी ५० ते ५५ रंगांनी भरलेले ट्रॅक्टर आमनेसामने होते. त्यामुळे रंगोत्सवाची रंगत वाढली. अनेकांनी रंगाच्या खेळात सहभागी होण्याऐवजी बाहेरगावी जाऊन पर्यटनाचा आनंद लुटला. फक्त रंगाच्या खेळात सहभागी नागरिकांसाठी रस्ते फुलले होते. सकाळी नऊपासून दुपार चारपर्यंत गल्लीबोळात ढोल-ताशा व ध्वनिक्षेपक लावून रंगाची उधळण होत होती. चिमुरडे व युवक रंग शिंपडीत होतेच; पण ज्येष्ठही शांत नव्हते. महिलाही सहभागी झाल्या होत्या. हालकडीच्या वाद्यावर गल्लीतून फिरून अनेकांनी एकमेकांना रंग लावला. डीजेचा जल्लोष एकीकडे, तर युवकांची घोषणाबाजी व जल्लोष दुसरीकडे. यामुळे रंगपंचमी अधिकच खुलली. ठिकठिकाणी रंगांचे टीप ठेवून दुपारी चारपर्यंत आनंद लुटणारे येवलेकर सायंकाळी पाचला टिळक मैदानात व डीजे रोडवर आले. या दोन्ही ठिकाणी रंगाचे सामने रंगले. टिळक मैदानात ट्रॅक्टर समोरासमोर आले. अन्य रंगोत्सवाला सुरुवात झाली. यंदा १२२ ट्रॅक्टरमध्ये रंगांनी दुतर्फा भरलेले टीप होते. बादल्यांनी रंग फेकून एकमेकांवर रंगांची उधळण होत होती. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे रंगाचा हा सामना अधिकच रंगला. ट्रॅक्टर समोरासमोर आल्यानंतर रंग फेकण्यासाठी प्रत्येक जण तुटून पडला होता. ट्रॅक्टर रिकामा झाला की लगेचच गावाच्या मध्यवस्तीत पाणी व्यवस्थेवरून ट्रॅक्टरमधील टिपात पाणी भरून रंग बनवून पुन्हा सामन्यात सहभाग घेतला जात होता. तासभर सुरू असलेले हे सामने नवचैतन्याच्या धुंदीतच थांबले; पण नंतरही अंधार पडेपर्यंत रंगांची उधळण सुरूच होती. सर्व जातिधर्मातील नागरिक या सामन्यात सहभागी झाले होते. श्रीमान शेठ गंगाराम छबीलदास पेढीचे चालक यांनी आपल्या कुटुंबासह परंपरेनुसार बालाजी मंदिरात देवाबरोबर रंग खेळले गेले, तर सायंकाळी सटवाईची मिरवणूकही निघाली होती. टिळक मैदानात सायंकाळी पाच वाजता तर डी.जे. रोडवरील रंगयुद्ध, शंखनाद, नारळ वाढवून आणि फटाक्यांची आतषबाजी करीत संस्कृतिकार प्रभाकर झळके, ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाटील, संजय कुक्कर, राजेंद्र लोणारी, लालाभाऊ कुक्कर, माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, नगरसेवक झामभाऊ जावळे, सचिन मोरे, पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी रंगपंचमी साजरी केली. वादविवाद न होता आनंदी वातावरणात रंगयुद्ध पार पडले.