पिवळ्या पट्ट्याची ‘लक्ष्मणरेखा’ : एम.जी.रोडवरील वाहनउचलेगिरीला ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 09:16 PM2018-06-09T21:16:57+5:302018-06-09T21:16:57+5:30
नाशिक : शहरातील बाजारपेठ व अत्यंत वर्दळीचा प्रमुख मात्र अरुंद असलेला एम.जी.रोड वाहतूक कोंडीसाठी प्रसिद्ध आहे. एम.जी. रोडवर अनेकदा वाहन उचलण्यावरून नागरिक व पोलिसांमध्ये खटके उडतात. या समस्येवर उपाय म्हणून पोलिसांनी पिवळ्या पट्ट्याची लक्ष्मणरेखा आखून देत वाहन पार्किंगला मुभा दिली आहे.
सम-विषम तारखेनुसार पी१, पी२ पार्किंगची सुविधा एम.जी.रोडवर देण्यात आली होती; मात्र या नियमांचे पालन नागरिकांकडून होत नसल्याने अनेकदा वाहने टोर्इंग करून पोलिसांकडून नेली जात होती. एकू णच एमजी रोडवरील वाहतूक व्यवस्था आणि पार्किंग व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने पोलीस प्रशासनाविरुध्द नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. महापालिकेकडून वाहनतळाची अधिकृत व्यवस्था नागरिकांसाठी या भागात करण्यात आलेली नाही. त्यामुळे वाहनतळाची सुविधा न पुरविता नागरिकांवर रस्त्यालगत वाहने उभी केली म्हणून दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम अन्यायकारक असल्याचे बोलले जात होते. एम.जी.रोडवर सातत्याने वाहतूक पोलीस, टोर्इंग कर्मचारी व नागरिकांमध्ये वादविवादाच्या घटना घडत होत्या. यामुळे पोलीस दलाचे नावलौकिकाला तडा जात होता. याबाबत पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्याकडे तक्रारींचा ओघ सातत्याने सुरू होता. अखेर पोलीस प्रशासनाने या समस्येवर ‘पिवळी लक्ष्मणरेखा’ आखण्याचा उपाय केला. पिवळ्या पट्ट्याच्या आत नागरिक आपली हलकी वाहने उभी करू शकतात, अशी नवी अधिसूचना उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी गुरुवारी (दि.७) जाहीर केली. रस्त्याच्या दुतर्फा पिवळा पट्टा मारण्यात येणार असून या पट्ट्यामध्ये नागरिकांनी वाहने उभी करावी, अन्यथा ‘नो पार्किंग’च्या टोर्इंग कारवाईला सामोरे जावे लागेल, असे पाटील यांनी अधिसूचनेत म्हटले आहे. या भागातील व्यावसायिक वर्गाकडे मालाची ने-आण करण्यासाठी येणाऱ्या अवजड वाहनांना मात्र पिवळ्या पट्ट्यात उभे करण्यास अधिसूचनेत मज्जाव असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कुठल्याही प्रकारची अवजड वाहने एमजीरोडच्या दुतर्फा उभी राहणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.