येवला तालुका : पंचायत समितीत तीन गावे, एका वाडीचा टॅँकरसाठी प्रस्ताव डिसेंबरमध्येच पाणीटंचाईची झळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 11:51 PM2017-12-12T23:51:28+5:302017-12-13T00:22:00+5:30
तालुक्याला डिसेंबरमध्येच पाणीटंचाईची तीव्रता जाणवू लागली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात पाणीपुरवठा करणाºया विहिरी आटल्या असून, पाणीटंचाईची झळ उत्तरपूर्व भागात बसायला सुरुवात झाली आहे.
येवला : तालुक्याला डिसेंबरमध्येच पाणीटंचाईची तीव्रता जाणवू लागली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात पाणीपुरवठा करणाºया विहिरी आटल्या असून, पाणीटंचाईची झळ उत्तरपूर्व भागात बसायला सुरुवात झाली आहे. विहिरीचे स्रोत आटल्याने व तळ उघडा पडू लागल्याने टँकरने पाणीपुरवठा करावा यासाठी तीन गावे आणि एक वाडीचा टँकर मागणीचा प्रस्ताव येवला पंचायत समितीकडे दाखल झाला आहे. पाणी टँकर अद्याप तालुक्यात सुरू नसला तरी गावोगावचे पाणीटंचाईचे ठराव यायला सुरुवात झाली आहे. यामुळे आगामी सहा महिन्यांत पाणीटंचाई तालुक्याला हैराण करणार असल्याचे चित्र आजच दिसत आहे. पंचायत समिती आणि तहसीलचा संयुक्त पाहणी दौरा मात्र अजून सुरू झालेला नाही. तालुक्यातील अहेरवाडी, खैरगव्हाण, कुसमाडी ही तीन गावे आणि गोपाळ वाडीचे (खैरगव्हाण) टॅँकर प्रस्ताव येवला पंचायत समितीकडे दाखल करण्यात आले आहे.
असा होतो मागणीचा प्रस्ताव मंजूर
पाणीटंचाईच्या गावात प्रथम ग्रामपंचायतीत महिला कमिटी टंचाईचा ठराव करून पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल करते. गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांची संयुक्त समिती संबंधित गावाला भेट देऊन पाहणी करते. त्यानंतर आवश्यकता असल्यास सदरचा प्रस्ताव प्रांताधिकारी कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविला जातो. मंजुरी मिळाल्यानंतर गावाला टँकर सुरू होतो.
पाणीटंचाई कृती आराखडा
गेल्या वर्षी सन २०१५-१६ मध्ये येवला तालुक्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. अंतिम टप्प्यात तब्बल ६३ गावे, ४४ वाड्यांना ३३ टँकर्सद्वारे दररोज ११६ खेपा करून पाणीपुरवठा करण्यात आला होता. २०१६-१७ मध्ये ४८२ मिलीमीटर एवढा पाऊस झाल्याने तुलनेने पाणीटंचाईची तीव्रता काहीशी कमी झाली होती; मात्र तालुका टँकरमुक्त होण्यासाठी नवीन पाणीस्रोत व साठवण करण्याची गरज नक्कीच कायम राहिली आहे. यंदा पालखेडचे आवर्तन फिरल्याने शेतीला पुरेसे पाणी मिळाले नसले तरी अनेक गावांची पिण्याच्या पाण्याची टंचाई काहीकाळ लांबणीवर पडली होती. यंदा मात्र डिसेंबरमध्येच पाणीटंचाई भासू लागली आहे. टॅँकरचे प्रस्ताव दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
पाणीटंचाई आणि कृती आराखडा
पंचायत समितीच्या वतीने पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार करून दरवर्षी मंजूर केला जातो. या आराखड्यात उपाययोजना करताना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे हीच उपाययोजना प्राधान्याने विचारात घेतली जाते; मात्र पाणीपुरवठा निवारण करण्यासाठी विहीर, विंधन विहीर घेणे व लगतचे जलस्रोत बळकट करण्याचे उपाय मात्र केवळ कागदावरच राहतात, तर प्रत्यक्षात किती उतरवले जातात हा संशोधनाचा विषय आहे. गेल्या वर्षी पाणीटंचाईच्या दुसºया टप्प्यात कृती आराखड्याच्या कागदावर जानेवारी २०१७ ते मार्च २०१७ या तीन महिन्यांत २१ गावे आणि २४ वाड्यांना टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागणार असल्याचे नियोजन होते; मात्र तालुक्यात ४८२ मिलीमीटर पाऊस झाल्याने केवळ बाळापूर या एका गावाचा टँकर प्रस्ताव आला होता. यंदा जानेवारी ते मार्च २०१८ या तीन महिन्यांच्या कालावधीत ३४ गावे व २३ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन प्रस्तावित आहे.