येसोजी महाराज मिरवणूक रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:14 AM2021-03-28T04:14:18+5:302021-03-28T04:14:18+5:30
नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन नाशिक : कोरोनाचे संकट अधिक वाढत असून अनेक घरांमध्ये रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी ...
नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
नाशिक : कोरोनाचे संकट अधिक वाढत असून अनेक घरांमध्ये रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी स्वत:च स्वत:ची काळजी घेऊन नियमांचे पालन करावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. कामाशिवाय घराबाहेर फिरू नये, असे आवाहन आरोग्य प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
संचारबंदीतही नागरिकांचा घराबाहेर वावर
नाशिक : जिल्हा प्रशासनाच्यावतीने रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी अनेक नागरिक रात्री घराबाहेर फिरत असल्याचे दिसून येत आहे. अशा नागरिकांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
फेम चौकातील सिग्नल बंद
नाशिक : मागील तीन-चार दिवसांपासून फेम चौकातील सिग्नल यंत्रणा बंद आहे. यामुळे या ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होतो. यामुळे वाहनचालकांध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. येथील सिग्नल यंत्रणा दुरुस्त करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
भाजीपाला आवकेवर परिणाम
नाशिक : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारतबंदमुळे गेल्या शुक्रवारी नाशिक बाजार समितीमध्ये भाजीपाला आवकेवर परिणाम झाला. बाजार समितीत दररोज होणारी गर्दीही यामुळे कमी असल्याचे दिसून आले. बंदमुळे अनेक शेतकऱ्यांनी वावरातून भाजीपाला काढला नाही. दरांवर मात्र त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही.
वाढत्या उष्म्यामुळे नागरिक त्रस्त
नाशिक : शहरात उन्हाचा तडाखा वाढला असून वाढत्या उष्म्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कधी कधी वातावरणात होणाऱ्या बदलामुळे दिवसभर संमिश्र वातावरण असते. नागरिकांनी उन्हाळ्यात काळजी घेऊन जास्तीत जास्त पाणी प्यावे, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.
कोविड चाचण्यांसाठी होतेय गर्दी
नाशिक : महापालिकेने कोरोना चाचण्या करण्यास सुरुवात केल्याने अनेक चाचणी केंद्रांवर नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. अनेक नागरिक सकाळपासूनच चाचणी केंद्रावर नंबर लावत असतात. यामुळे काही ठिकाणी नागरिकांच्या रांगा लागलेल्या दिसून येतात.
बिटको रुग्णालयाचा अनेकांना आधार
नाशिक : कोरोना संकटाच्या काळात नाशिकरोड येथील बिटको रुग्णालय अनेक गोरगरीब नागरिकांचे आधार बनले आहे. परिसरातील खेड्यांसह थेट सिन्नर, इगतपुरी येथील रुग्णही बिटको रुग्णालयात दाखल होत असल्याने रुग्णालय परिसरात गर्दी दिसून येत आहे.
शहरात अवैध मद्यविक्री जोरात
नाशिक : सायंकाळी सातनंदर मद्य विक्रीची दुकाने बंद होत असल्याने शहरातील अनेक भागात अवैध मद्यविक्रीचा जोर वाढला आहे. पोलिसांना यातील बहुसंख्य ठिकाणे परिचयाची असली तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. अवैध मद्यविक्रीला पोलिसांनी पायबंद घालावा व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
सततच्या संकटामुळे द्राक्ष उत्पादक अडचणीत
नाशिक : कोविडच्या संकटामुळे सलग दुसऱ्यांदा द्राक्षांवर संकट कोसळल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. द्राक्षबागांसाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च करावे लागतात आणि ऐन हंगामाच्या वेळीच लॉकडाऊनसारखी स्थिती निर्माण झाल्याने द्राक्षांची मागणी घटली आहे. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.