येवला पालिकेला दोन कोटींचा विकासनिधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 06:13 PM2018-10-11T18:13:23+5:302018-10-11T18:14:55+5:30
येवला नगरपालिकेला विविध विकासकामांसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजना अनुदानातून दोन कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
येवला : नगरपालिकेला विविध विकासकामांसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजना अनुदानातून दोन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. शिवाय पालिकेने काही प्रस्ताव पाठविले असल्याचे उपनगराध्यक्ष सूरज पटणी यांनी सांगितले.
येथील पालिकेवर भाजपा-शिवसेनेची सत्ता असून, शासन स्तरावरून निधी मिळविण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून अनेक प्रस्ताव दिलेले आहेत. वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी शासन पालिकांना विशेष अनुदान देते. त्यात येवला पालिकेचा समावेश करून निधी द्यावा, अशी मागणी स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पत्र देऊन केली होती. या अनुदानासह इतर निधीसाठी नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडे मागणी केली होती. शासनाने मागील आठवड्यात राज्यातील पालिकांना दोनशे बावीस कोटी रु पये वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे. या अंतर्गत येवला पालिकेला विविध विकासकामांसाठी दोन कोटींचा निधी देण्याचे शासन परिपत्रक आज दराडे यांना नगरविकास विभागाकडून मिळाले आहे. या निधीतून शहर हद्दीत विविध सार्वजनिक स्वरूपाची कामे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पालिका करू शकते. सद्यस्थितीत शहरातील बाजारओटे, त्यासाठी शेड, काँक्रि टीकरण व ड्रेनेजची व्यवस्था करण्याचे या निधीतून प्रस्तावित असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले; मात्र यावर सर्वानुमते निर्णय घेऊन निधी खर्च केला जाणार आहे. या व्यतिरिक्त इतर विकासकामांचे प्रस्तावदेखील शासन दरबारी देण्यात आलेले आहे. भूमिगत गटार योजना नव्या स्वरूपात करण्यासाठीदेखील प्रस्ताव सादर केलेले आहेत. या कामांना निधीसाठी पालकमंत्री महाजन यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार दराडे बंधूंनी दिली.