येवलेकरांनी कोरोनामुक्तीवर केले शिक्कामोर्तब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 10:07 PM2020-05-21T22:07:56+5:302020-05-21T23:33:34+5:30
नाशिक : रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या रुग्णाकडूनच कोरोनाच्या संसर्गाचा प्रवास सुरू झाला. एका रुग्णाला झालेल्या लागणनंतर संपूर्ण येवला शहर व तालुक्यातील गावागावात कोरोनाचा प्रसार वाढीस लागून बाधित रुग्णांची संख्या ३३ पर्यंत पोहोचली. जागतिक पातळीवर प्रगत देशांना भयभीत करणाऱ्या कोरोनावर अखेर आरोग्य विभागाने महिनाभर सातत्याने स्थानिक पातळीवर उपाययोजना राबवून येवला तालुक्याने कोरोनामुक्तीवर शिक्कामोर्तब केले.
नाशिक : रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या रुग्णाकडूनच कोरोनाच्या संसर्गाचा प्रवास सुरू झाला. एका रुग्णाला झालेल्या लागणनंतर संपूर्ण येवला शहर व तालुक्यातील गावागावात कोरोनाचा प्रसार वाढीस लागून बाधित रुग्णांची संख्या ३३ पर्यंत पोहोचली. जागतिक पातळीवर प्रगत देशांना भयभीत करणाऱ्या कोरोनावर अखेर आरोग्य विभागाने महिनाभर सातत्याने स्थानिक पातळीवर उपाययोजना राबवून
येवला तालुक्याने कोरोनामुक्तीवर शिक्कामोर्तब केले. नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यापाठोपाठ येवला येथे कोरोनाचा एक रुग्ण सापडल्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागापर्यंत कोरोनाची पाळेमुळे रोवली गेल्याची भीती व्यक्त केली गेली. निव्वळ मालेगावी सुनेचे बाळंतपण करण्यासाठी गेलेल्या येवल्याच्या एकाच कुटुंबातील सात जणांमध्ये एका पाठोपाठ कोरोनाची लक्षणे आढळून आली. पहिला रुग्ण आढळल्यानंतर त्याला तत्काळ अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले व खबरदारी म्हणून कुटुंबातील अन्य व्यक्तींनाही संशयित म्हणून दाखल केले असता, तेदेखील कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. येवल्यात सापडलेल्या या रुग्णांचे मालेगाव कनेक्शन होते व सर्वच्या सर्व उपचारार्थ दाखल झाल्याने आरोग्य खात्याने काहीसा सुटकेचा श्वास घेतला असताना येवल्यातील ग्रामीण रुग्णालयातील एका महिला कर्मचाºयात कोरोनाची लक्षणे दिसून आली. ज्या महिलेचे मालेगावी बाळंतपण झाले ती नंतर वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात आली होती. तिच्या संपर्कात महिला आरोग्य कर्मचारी आल्याने कोरोनाचा संसर्ग वाढला. संपूर्ण आरोग्य यंत्रणा हादरली. ग्रामीण रुग्णालयातील ४४ कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता, त्यातील बारा कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडल्याचे स्पष्ट झाले. त्यातून प्रचार व प्रसारामुळे कोरोनाने येवला शहरासह ग्रामीण भागातही हातपाय पसरविले. मात्र कोरोनावर मात करण्याचा विडा आरोग्य विभागानेच उचलला. येवल्यात कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर सुरू करून कोरोनाबाधितांना तेथे हलविले व जलदगतीने उपचार सुरू केले. जवळपास दोनशेहून अधिक संशयितांना केअर सेंटरमध्ये तर बाधितांवर हेल्थ सेंटरमध्ये आधुनिक उपचार पद्धतीचा अवलंब केला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेने संपूर्ण गावात रुग्ण सर्वेक्षण मोहीम राबविली. कंटेनमेंट झोन जाहीर करून कोरोनाचा प्रचार, प्रसारावर नियंत्रण मिळविले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा आरोग्य अधिकारी कपिल आहेर यांनी सर्व विभागांशी समन्वय ठेवून कोरोना विरुद्धच्या लढाईत विजय मिळविला व तब्बल एका महिन्यानंतर येवल्याला कोरोनाच्या महामारीतून मुक्त केले.
----------------------------
कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या ठिकाणी कंटेनमेंट झोन जाहीर करून तेथील नागरिकांची घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यासाठी २०० आरोग्य पथके कार्यरत होती. त्यामुळेच कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले. याशिवाय रुग्णांवर स्थानिक ठिकाणीच उपचारासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केअर सेंटर, हेल्थ केअर सेंटर सुरू करून सर्व यंत्रणांशी समन्वयाची भूमिका बजावली. त्यामुळे कोरोनाचे नवीन रुग्ण सामोरे येऊ शकले नाहीत. सर्वांच्या प्रयत्नांनी येवला कोरोनामुक्त होऊ शकले.
- डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी