येवल्यात कांदा भावात घसरण, १५ हजार क्विंटलची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 03:23 PM2018-03-19T15:23:48+5:302018-03-19T15:23:48+5:30
येवला : शासनाने निर्यातमूल्य शून्य डॉलर केल्यानंतर कांद्याचे भाव वाढतील असा अंदाज आता खोटा ठरताना दिसत असून येवला व अंदरसूल कांदा बाजार आवारात बाजारभाव सातत्याने गडगडत आहेत.
येवला : शासनाने निर्यातमूल्य शून्य डॉलर केल्यानंतर कांद्याचे भाव वाढतील असा अंदाज आता खोटा ठरताना दिसत असून येवला व अंदरसूल कांदा बाजार आवारात बाजारभाव सातत्याने गडगडत आहेत. येवला कांदा बाजार आवारात लाल कांद्याचे भाव किमान रु ३०० ते कमाल ७२० सरासरी ६७० पर्यंत होते. तर उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान ३०० ते कमाल ७५० तर सरासरी ६८० पर्यंत होते. आवक ४५० ट्रक्टर, २०० रिक्षा, पिकअपमधून १५ हजार क्विंटलची आवक झाली. मागच्या आठवड्याच्या तुलनेत देशातील इतरत्र असलेल्या राज्यांमध्ये कांद्याचे विक्र मी उत्पादन निघाल्यामुळे कांद्याचे दर कोसळण्यास सुरु वात झाली असल्याचे व्यापारी वर्गाने सांगितले. फेब्रुवारीच्या तुलनेत कांदा दरात १५०० रु पयांची घसरण झाल्याने कांद्याचे दर आठशे रु पयांच्या आत आले. ही घसरण लवकर न थांबल्यास कांदा उत्पादक अडचणीत सापडतील. देशातील मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातसह पश्चिम बंगालमध्ये नवीन कांद्याची आवक झाल्याने तसेच पुणे व नगर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याचे पिक निघाल्याने मागणी कमी झाल्याने भावात घसरण होत असल्याचे बोलले जात आहे. कांद्याचे सरासरी दर घसरण्यामागे कांद्याची इतरत्र व स्थानिक बाजारात वाढलेली आवक देखील कारणीभूत असल्याचेही मत कांदा तज्ज्ञ व्यक्त करतात. उत्तर भारतातील होळीसाठी कामगार सुटीवर जात असल्याने कांदा लोडिंगसाठी मजूर नसल्यानेही कांदा खरेदीवर परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे.