हजारो साधकांची योगसाधना

By admin | Published: June 22, 2017 12:18 AM2017-06-22T00:18:42+5:302017-06-22T00:18:55+5:30

नाशिक : भद्रासन, वज्रासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन या आणि अशा विविध आसनांचे सादरीकरण बुधवारी (दि.२१) जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस कवायत मैदान येथे करण्यात आले होते.

Yoga for thousands of seekers | हजारो साधकांची योगसाधना

हजारो साधकांची योगसाधना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : भद्रासन, वज्रासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन या आणि अशा विविध आसनांचे सादरीकरण बुधवारी (दि.२१) जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस कवायत मैदान येथे करण्यात आले होते. कोवळ्या सूर्यकिरणांच्या साक्षीने आणि मंजुळ बासरीच्या सुरावटीने योग शिबिरास सुरुवात करण्यात आली. लोकमत सखी मंच, नाशिक महानगरपालिका, योग क्रीडा प्रबोधिनी आणि नाशिक शहर पोलीस आयुक्तालय यांच्या वतीने आयोजित या योग शिबिरात योग साधकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. योग शिबिरांतर्गत योग क्रीडा प्रबोधिनीच्या डॉ. किरण जैन यांच्या मार्गदर्शनाखाली विविध आसनांची प्रात्यक्षिके आणि माहिती साधकांना देण्यात आली. योग शिबिराची सुरुवात मानेच्या हालचालीने झाली. यानंतर स्कंध संचलन, मेरूदंड संचलन, जानू संचलन तसेच दंडस्थिती, बैठकस्थिती, शयनस्थिती आदि आसनांचे सादरीकरण करण्यात आले.
डॉ. किरण जैन यांनी साधकांना मार्गदर्शन करताना प्रत्येक आसन कसे करायचे, आसन करताना कुठली काळजी घ्यायची यांसह आसनांपासून मिळणारे फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. भारतीय संस्कृतीत योग साधनेला विशेष महत्त्व असून, शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगाचा विशेष फायदा होत असल्याचे सांगितले.  कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या महापौर रंजना भानसी यांनी ‘लोकमत’च्या योगदिनाच्या उपक्रमांस शुभेच्छा दिल्या, तसेच योग साधनेत सातत्य राखण्याचे आवाहन केले. पोलीस उपआयुक्त माधुरी कांगणे यांनी आपल्या जीवनात योग साधनेस अनन्यसाधारण महत्त्व असून, आपल्या देशाला लाभलेल्या या संस्कृतीचे जतन करणे आवश्यक असल्याचे मत वयक्त केले. केले. ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी योग साधनेला अंत नसून योग साधना अखंडितपणे सुरू ठेवावी, असे आवाहन करताना केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. वायुनंदन, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, लक्ष्मीकांत पाटील, माधुरी कांगणे, सहायक पोलीस आयुक्त अजय देवरे, अशोक नखाते, डॉ. राजू भुजबळ, क्रेडाइचे अध्यक्ष सुनील कोतवाल, योग क्रीडा प्रबोधिनीचे डॉ. प्रेमचंद जैन, किरण जैन उपस्थित होते. प्रारंभी स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पाहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने योग साधनेस सुरुवात करण्यात आली. ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक व निवासी संपादक किरण अग्रवाल यांच्या हस्ते योगसाधनेवरील पुस्तके देऊन प्रमुख अतिथींचे स्वागत केले. यावेळी उपस्थित साधकांना मान्यवरांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत या योग शिबिरास विविध वयोगटातील साधक विशेषत: लहान मुले, पोलीस कर्मचारी, कमांडोज यांचा विशेष सहभाग होता.


 

Web Title: Yoga for thousands of seekers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.