राज्यभरातील शाळांच्या विद्यार्थ्यांना यंदापासून योगाचेही प्रशिक्षण
By धनंजय रिसोडकर | Published: June 20, 2024 07:03 PM2024-06-20T19:03:34+5:302024-06-20T19:06:31+5:30
सर्वप्रथम जळगाव जिल्ह्यातील सर्व शाळांच्या क्रीडाशिक्षकांना जूनअखेर किंवा जुलैच्या महिन्यात प्रशिक्षण देऊन उपक्रमाला प्रारंभ करण्यात येणार आहे.
धनंजय रिसोडकर, लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: राज्यभरातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून योग प्रशिक्षणाचे प्राथमिक धडे गिरवण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी राज्यभरातील सर्व शाळांच्या क्रीडा शिक्षकांना नाशिकच्या आदिशक्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत मोफत शास्त्रोक्त योग प्रशिक्षण दिले जाणार आहे. ते क्रीडा शिक्षक त्यांच्या संबंधित शाळांतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार असून, त्यासाठी सर्वप्रथम जळगाव जिल्ह्यातील सर्व शाळांच्या क्रीडाशिक्षकांना जूनअखेर किंवा जुलैच्या महिन्यात प्रशिक्षण देऊन उपक्रमाला प्रारंभ करण्यात येणार आहे.
आदिशक्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या यज्ञ उपक्रमांतर्गत २०१९ मध्ये नाशिक जिल्ह्यातील पावणेदोन लाख विद्यार्थ्यांना मोफत योग प्रशिक्षण देण्यात आले होते. त्याच धर्तीवर प्रस्ताव तयार करून राज्यातील सर्व क्रीडा शिक्षकांना किंवा शाळांमधील विद्यार्थ्यांना विनामूल्य योग प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शविण्यात आली होती. त्यावर एप्रिल महिन्यातच शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद प्राप्त झाला असून, त्याच्या अंमलबजावणीला जळगाव जिल्ह्यापासून प्रारंभ करण्यात येत आहे.
त्यात जळगावचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या माध्यमातून जळगावच्या सर्व शाळांच्या क्रीडा शिक्षकांचे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. त्यात संस्थेचे योगशिक्षक हे त्या शिक्षकांना शास्त्रोक्त पद्धतीने योगाचे प्रशिक्षण देणार आहेत. त्यानंतर त्या शिक्षकांकडून आपापल्या शाळांतील विद्यार्थ्यांना पीटीच्या तासात महिन्यातून किमान एकदा तरी योग प्रशिक्षण दिले जाणार असल्याने टप्प्प्याटप्प्याने सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शास्त्रोक्त पद्धतीने योग पोहोचू शकणार आहे.