नाथ संप्रदायातील योगी ज्ञाननाथ रानडे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:59 AM2017-09-26T00:59:56+5:302017-09-26T01:00:02+5:30
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या गुरू-शिष्य परंपरेतील अठरावे दीक्षित नाथयोगी ज्ञाननाथजी रानडे यांचे रविवारी (दि.२४) पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने नाथ संप्रदायाबरोबरच वारकरी संप्रदायातील एक दुवा निखळला आहे. पुण्यासह नाशिक, मुंबई परिसरात त्यांचा मोठा शिष्यवर्ग आहे.
नाशिक : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या गुरू-शिष्य परंपरेतील अठरावे दीक्षित नाथयोगी ज्ञाननाथजी रानडे यांचे रविवारी (दि.२४) पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने नाथ संप्रदायाबरोबरच वारकरी संप्रदायातील एक दुवा निखळला आहे. पुण्यासह नाशिक, मुंबई परिसरात त्यांचा मोठा शिष्यवर्ग आहे.
ज्ञाननाथजी मूळचे नाशिकचे. ५ सप्टेंबर १९२४ रोजी त्यांचा जन्म नाशिकला झाला. त्यांचे मूळ नाव बापू नारायण रानडे. शंकर महाराजांचे सान्निध्य त्यांना बालपणापासून लाभले. योगी हरिनाथजी यांच्याकडून त्यांना त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यात वयाच्या १८ व्या वर्षी पूर्ण नाथदीक्षा प्राप्त झाली होती. त्यानंतर पुढे पन्नास वर्षे त्यांनी शहर व ग्रामीण भागात कीर्तनसेवा, निर्गुण भजन सेवा केली. श्रीज्ञानेश्वरी सप्तजन्म शताब्दी वर्षात त्यांनी वर्षभर आळंदीत वास्तव्य केले होते. त्यांनी लिहिलेली जंगली महाराज ऊर्फ जागरनाथ, हरिनाथबाबा, मी पाहिलेले शंकर महाराज, गोविंदकाका उपळेकर, दादा महाराज सातारकर, जोगन विठामाई, विश्वनाथ महाराज रुकडीकर ही चरित्रे प्रसिद्ध आहेत. याशिवाय त्यांनी विविध वृत्तपत्रांतून नाथपरंपरेवर विपुल लेखन केले. पंढरपूर वारी सुरू झाल्यानंतर ‘मनोमय वारी’ हा उपक्रम त्यांनी सुरू केला होता. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.