सटाण्यात राष्ट्रवादीच्या बैठकीत तू तू मैं मैं

By admin | Published: October 16, 2016 02:36 AM2016-10-16T02:36:04+5:302016-10-16T02:45:17+5:30

पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर : निष्ठावान कार्यकर्त्यांचा बळी दिला जात असल्याचा आरोप

You are my mother in the meeting of the NCP | सटाण्यात राष्ट्रवादीच्या बैठकीत तू तू मैं मैं

सटाण्यात राष्ट्रवादीच्या बैठकीत तू तू मैं मैं

Next

सटाणा : तडजोडीच्या राजकारणामुळे बागलाण तालुक्यातील ब्राह्मणगाव गटात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची वाताहत झाली आहे. सोयीच्या राजकारणामुळे निष्ठावान कार्यकर्त्याचा बळी दिला जात आहे. अशा प्रवृत्तींना वेळीच आळा न घातल्यास पक्षातील गद्दारांची नावे जाहीर करू, असा इशारा देत पक्षातील पदाधिकारी व छगन भुजबळ समर्थक सुनील महाजन यांनी पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आणला. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्ता यांच्यात चांगलीच तू तू मैं मैं झाल्याचे चित्र राष्ट्रवादीच्या बैठकीत बघायला मिळाले.
शहरातील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात शनिवारी (दि. १५) दुपारी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इच्छुकांची बैठक आयोजित करण्यात आली. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे होते. प्रारंभीच इच्छुकांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय द्यावा, असा सूर ठेंगोडा गटातील इच्छुक व मोरेनगरच्या सरपंच अनिता मोरे यांचे पती बाळकृष्ण मोरे यांनी आळवला. त् तोच धागा पकडत मोरेनगरचे माजी सरपंच अरुण सोनवणे यांनी पत्नी रंजना व स्नुषा सायली सोनवणे यांची ठेंगोडा गटात दावेदारी केली. त्यानंतर वीरगाव गटात इच्छुकांचा अभाव, नामपूर गटातदेखील मोराने येथील पितापुत्रवगळता इच्छुकांचा अभाव दिसून आला. मात्र ब्राह्मणगाव हा ओबीसी महिलांसाठी राखीव गट असताना एकही इच्छुक नसल्याने अजमीर सौंदाणेचे उपसरपंच व पक्षाचे पदाधिकारी सुनील मोरे यांनी तालुक्यातील पक्ष नेतृत्वावरच हल्लाबोल केला. स्वत:च्या स्वार्थासाठी काही मंडळी तडजोडीचे राजकारण करतात. यामुळे पक्षाची तर वाताहत होतेच; परंतु गरीब निष्ठावान कार्यकर्त्यांचा बळी दिला जातो.
ब्राह्मणगाव गट हे त्याचे ज्वलंत उदाहरण असल्याचा दाखलाही त्यांनी दिला. अशा प्रकारचे राजकारण कोणी करत असेल तर त्यांची पुराव्यानिशी नावे जाहीर करू, असे महाजन यांनी सांगितल्याने काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी महाजन यांना विरोध केल्याने रत्नाकर सोनवणे यांनी विरोध करणाऱ्यांना दंडुक्याचा धाक दाखवत महाजन यांच्या वक्तव्याचे समर्थन केले.
यावेळी कार्यकर्ता व पदाधिकारी यांच्यात तू तू मैं मै सुरू असताना जायखेडा गटाचे जिल्हा परिषद सदस्य यतीन पगार हे उमेदवारीसाठी दावेदारी करत असताना एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने तुम्हाला तिकीट नसल्याचे सांगितल्याने नाराज झालेल्या पगार यांनी तत्काळ बैठकीचा त्याग केला, तर पठावे दिगर गटाच्या सदस्य सिंधूबाई सोनवणे यांचे पती संजय सोनवणे यांनी पाच वर्ष आपल्या गटात विकासाभिमुख काम करत असताना पक्षातील काही मंडळी स्पर्धक तयार करून आमचे खच्चीकरण करतात, असा आरोप करत त्यांनीही बैठकीचा त्याग केला. पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
बैठकीस विधानसभा अध्यक्ष धर्मराज खैरनार, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, मविप्रचे उपसभापती नानाजी दळवी, खेमराज कोर, एस.टी. देवरे, माजी आमदार संजय चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य शैलेश सूर्यवंशी, पंचायत समितीचे उपसभापती वसंतराव भामरे, रामकृष्ण अहिरे, रवींद्र भामरे, राजेंद्र सावळा, अनिल चव्हाण, के.टी. ठाकरे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष रेखा शिंदे, उषा भामरे, वंदना भामरे, शमा दंडगव्हाळ , संगीता साबळे, किरण पाटील, अमोल बच्छाव, अशोक सावंत, दिनेश सावळा, डॉ.राकेश सोनवणे, यशवंत अहिरे, वीरेश घोडे, पंकज ठाकरे आदि उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे म्हणाले, निवडणूक आली की इच्छुकांची साहजिकच गर्दी होते. उमेदवारीची मागणी करणे हा कार्यकर्त्यांचा अधिकार आहे. पक्षाच्या दृष्टीने योग्य उमेदवाराला तिकीट देणे हा पक्षश्रेष्ठींचा अधिकार आहे. सक्षम उमेदवार शोधण्यासाठी प्रत्येक गटात लवकरच निवड समिती गठित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करून या समितीत त्या गटातील ज्येष्ठ, महिला व युवा पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात येईल ती समिती
जो अहवाल सादर करेल
त्यानुसारच तिकीट जाहीर करण्यात येईल, असे भामरे यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: You are my mother in the meeting of the NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.