वेशीपर्यंत आलायस... आता नव्या नवरीसारखा लाजू नकोस...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 02:32 PM2023-06-19T14:32:59+5:302023-06-19T14:33:54+5:30
सोशल मीडियावर पावसाच्या विविध पोस्ट घालताहेत थैमान
पाटोदा, जि. नाशिक (गोरख घुसळे): वेशीपर्यंत आलायस... आता नव्या नवरीसारखा लाजू नकोस... पटकन माप ओलांड आणि आत ये... कंजूसपणा करू नको... दिल खोलके बरस... येताना चोर पावलांनी नको, राजासारखा सनई चौघडे वाजवत ये... मान्सून लांबल्याने सगळ्यांच्याच नजरा आकाशाकडे लागल्या आहेत तर सोशल मीडियावर सध्या विविध पोस्ट थैमान घालताना दिसत आहेत.
खरीप हंगाम सुरू होऊन तीन आठवडे संपले तरी अद्याप पावसाने हजेरी न लावल्याने येवला तालुक्यातील शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. मात्र, पाऊस लांबल्याने पेरणीसाठी शेतकरीवर्गाची तगमग वाढली आहे. पाऊस उशिरा आल्यास खरीप हंगामातील घेतल्या जाणाऱ्या पिकांवर व पिकांच्या उत्पन्नावरही याचा परिणाम होणार असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
ना हिरवळ ओन्ली ढेकळ
ना पाणी ओन्ली ऊन,
काहीच ओके नाय,
औंदा अजून पाऊस नाय, असे म्हणण्याची वेळ शेतकरीवर्गावर आली आहे.
मागील वर्षी मे महिन्यातच मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकरीवर्गाने जूनच्या पहिल्या आठवड्यात खरीप हंगामातील पिकांची लागवड केली होती. यंदा मात्र मान्सूनपूर्व सोडाच जूनचा तिसरा आठवडा संपला तरी पावसाचा टीपूस नाही. त्यामुळे वेळत पाऊस न पडल्यास खरीप हंगाम वाया जातो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.