बससाठी गाठावी लागते गुडघाभर पाण्यातून वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:19 AM2021-09-16T04:19:21+5:302021-09-16T04:19:21+5:30
मालेगाव (शफीक शेख) : मालेगाव शहरात जुना आणि नवा अशी दोन बस स्थानके असून, पावसाळ्यात गुडघाभर पाण्यातून वाट काढत ...
मालेगाव (शफीक शेख) : मालेगाव शहरात जुना आणि नवा अशी दोन बस स्थानके असून, पावसाळ्यात गुडघाभर पाण्यातून वाट काढत प्रवाशांना बस गाठावी लागते, तर गटारगंगेचे पाणी नवीन बस स्थानक आवारात साचल्याने दुर्गंधी सुटते. त्यामुळे बाहेरगावहून शहरात येणाऱ्या प्रवाशांना नाकाला रुमाल लावूनच एसटीत प्रवेश करून प्रवास करावा लागतो. आगार व्यवस्थापकांनी महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही मनपा लक्ष देत नसल्याने लालफितीतला कारभार असल्याने समस्यांचा पाढा वाचावा तेवढा कमीच आहे. बाहेरगावहून येणाऱ्या प्रवाशांना साचलेल्या पाण्यातून लहान मुलांसह बसमध्ये प्रवेश करताना अडचणी येत आहेत. चिखल तुडवत बस स्थानक आवारातील बस गाठताना नाकीनऊ येत असून, महापालिका आणि एसटी प्रशासन यांनी संयुक्तपणे हा प्रश्न निकाली काढण्याची गरज आहे. मालेगाव आगारातून ६० कर्मचारी कोकणात गेले आहेत. त्यात ३० वाहक आणि ३० चालकांचा समावेश आहे. प्रवाशांना पाणी पिण्यासाठी पाण्याच्या टाकीची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, पावसाळ्यात पाणी विकत घेऊनच प्यावे लागते. पिण्याच्या पाण्याची बाटली मनमानी दरात विकली जात असल्याचे प्रवाशांनी सांगितले. सेवाभावी संस्थेतर्फे उन्हाळ्यात प्रवाशांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देऊन जलमंदिरातून त्यांची तृष्णा भागवली जाते. आगारात प्रथमोपचारासाठी प्रथमोपचार पेटी आहे. माता बालकांसाठी स्तनपान कक्ष आहे. मात्र, ते कुलूप बंद असते. गरज असेल, त्यावेळी चावी मागून घ्यावी लागते.
-----------------
मालेगाव आगारात ६ सुरक्षारक्षक देण्यात आले आहेत. स्वच्छतागृह असून, त्याची वेळोवेळी स्वच्छता होत नसल्याने दुर्गंधी पसरते. बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांकरिता नाश्ता, भोजन आणि चहासाठी उपहारगृह असून, त्याच पुरेशी स्वच्छता ठेवली जाते. मालेगाव शहरातील आयेशनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी एसटी स्थानकात तैनात असतो. त्यामुळे भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे.
- किरण धनवटे, आगार व्यवस्थापक