नाशकात आप ठप्प, माकपा गप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:44 AM2019-03-15T00:44:05+5:302019-03-15T00:46:14+5:30

सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने निवृत्त शासकीय अधिकाऱ्याला रिंगणात उतरवत आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. यंदा मात्र, आप पूर्णपणे ठप्प असून, बदलत्या राजकीय समीकरणांमुळे कार्यकर्तेही ‘झाडू’न सारे गायब असल्याचे चित्र दिसून येत आहे.

You jam in Nashik, CPI (M) is silent! | नाशकात आप ठप्प, माकपा गप्प!

नाशकात आप ठप्प, माकपा गप्प!

Next
ठळक मुद्देलोकसभा निवडणूक : बदलत्या समीकरणांमुळे ‘झाडू’न सारे गायब

नाशिक : सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने निवृत्त शासकीय अधिकाऱ्याला रिंगणात उतरवत आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. यंदा मात्र, आप पूर्णपणे ठप्प असून, बदलत्या राजकीय समीकरणांमुळे कार्यकर्तेही ‘झाडू’न सारे गायब असल्याचे चित्र दिसून येत आहे. आपबरोबरच माकपाकडूनही केवळ दिंडोरीचीच चर्चा घडविली जात असून, नाशिकबाबत पक्षनेत्यांनी तूर्त गप्प राहणेच पसंत केले आहे.
सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सन २०१३ मध्ये अरविंद केजरीवाल या माजी सनदी अधिकाऱ्याने आम आदमी पार्टीची स्थापना करत दिल्ली विधानसभा निवडणुकीत तब्बल २८ जागा पटकावल्या होत्या. पूर्ण बहुमत नसल्याने आपने अन्य पक्षांच्या मदतीने दिल्लीत सरकार स्थापन केले परंतु, ते अल्पजीवी ठरले. आपने दिल्लीत मारलेल्या मुसंडीमुळे देशभरात त्याची चर्चा सुरू झाली होती. त्याच बळावर आपने सन २०१४ च्या निवडणुकीत मोठी हवा निर्माण केली होती. त्यातूनच नाशिक लोकसभा मतदारसंघात जलसंपदा खात्यातून मुख्य अभियंता या पदावरून निवृत्त झालेले आणि जलसंपदा खात्यातील सिंचन घोटाळ्याबाबत आरोपांची राळ उठविणारे विजय पांढरे यांना निवडणुकीचे वेध लागले होते. अपेक्षेप्रमाणे विजय पांढरे यांनी नाशिक मतदारसंघात उमेदवारी केलीही परंतु, ९६७२ म्हणजे १.०३ टक्केच मते त्यांच्या पदरात पडू शकली होती. पांढरे यांचा आप सहाव्या क्रमांकावर फेकला गेला होता. गेल्या पाच वर्षांत राज्यात आपचा प्रभाव हळूहळू ओसरत गेला. आता लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असताना आणि अन्य पक्षात उमेदवारीबाबत चर्चा रंगली असताना आप मात्र पूर्णपणे ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. आपकडून उमेदवारीबाबत कुणाच्याही नावाची चर्चा होताना दिसून येत नाही. त्यामुळे यंदा आपकडून अन्य पक्षालाच ‘पहले आप’ म्हणत पुढे चाल देण्याची शक्यता बळावली आहे.
माकपाची संदिग्ध भूमिका
आपप्रमाणेच नाशिक मतदारसंघात माकपातही शांतता आहे. माकपाने केवळ दिंडोरीच्या जागेबाबत आग्रही भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात अ‍ॅड. तानाजी जायभावे यांनी उमेदवारी केली होती. त्यांना १७ हजार १५४ मते मिळविता आली होती. यंदा, नाशिकच्या उमेदवारीबाबत अवाक्षरही काढले जात नसल्याने माकपाच्याही भूमिकेबाबत संदिग्धता आहे. आपने नाशिकप्रमाणेच दिंडोरीतूनही प्रा. ज्ञानेश्वर माळी यांना उमेदवारी दिली होती; परंतु माळी यांना ४०६७ मतांपर्यंत मजल मारता आलेली होती.

Web Title: You jam in Nashik, CPI (M) is silent!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.