तुम्हीच सांगा, आम्ही जगायचं कसं ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 10:33 PM2020-04-07T22:33:50+5:302020-04-07T22:34:11+5:30
चहा व्यवसायात गेल्या १३ वर्षांपासून आहे पण अशी वेळ कधी आली नव्हती. कोरोनाच्या आजाराने आम्हाला जीवनातून उठवलं. हातात होते तेवढे पैसेही खर्च झाले अन् आता चहा दुकानाच्या गाळ्याचे आणि राहत्या घराचे भाडेही थकले आहे. सांगा, आम्ही आता कसं जगायचं, असा प्रश्न येथील संदीप काशीनाथ जाधव या चहा विक्रेत्यापुढे उभा ठाकला आहे.
मालेगाव : चहा व्यवसायात गेल्या १३ वर्षांपासून आहे पण अशी वेळ कधी आली नव्हती. कोरोनाच्या आजाराने आम्हाला जीवनातून उठवलं. हातात होते तेवढे पैसेही खर्च झाले अन् आता चहा दुकानाच्या गाळ्याचे आणि राहत्या घराचे भाडेही थकले आहे. सांगा, आम्ही आता कसं जगायचं, असा प्रश्न येथील संदीप काशीनाथ जाधव या चहा विक्रेत्यापुढे उभा ठाकला आहे.
मोसमपूल चौकात गेल्या १३ वर्षांपासून संदीप जाधव चहा विक्रीचा व्यवसाय करतात. दोन भाऊ आणि एक कामगार असे तिघे हा व्यवसाय सांभाळतात. कामगाराला १८० रुपये रोज द्यावा लागतो परंतु कोरोनाच्या भीतीमुळे आणि शासनाने लॉकडाउन केल्यामुळे सर्वच व्यवसाय बंद पडले असून आम्ही रस्त्यावर आलो आल्याची भावना जाधव व्यक्त करतात. संदीपच्या घरी आई, वडील, तीन भाऊ, वहिनी व २ मुले असा आठ जणांचा परिवार आहे. त्यांचा उदरनिर्वाह कसा चालवायचा या प्रश्नाने त्यांना सध्या चक्रावून सोडले आहे. घरात कमावते दुसरे कुणी नाही. सर्व काही हॉटेल व्यवसायावरच अवलंबून असल्याने आणि रोजचे उत्पन्न बंद झाल्याने उपासमार होऊ लागली आहे. गेल्या १५ दिवसांपासून चहा दुकान बंद आहे. दुकानाला ५ हजार रुपये भाडे आहे. घराचेही भाडे भरावे लागते. महिना भरल्याने घर आणि गाळा मालक यांचा भाडे वसुलीसाठी तगादा सुरू आहे. आम्हाला खायलाच पैसे नाही तर भाडे कसे देणार, असा सवाल ते उद्विगणेतून करतात.
रोज डेअरीतून ४० रुपये लिटर दराने ९० लिटर दूध घ्यायचो, परंतु तेसुद्धा थांबले आहे. डेअरीवाल्याकडूनही हॉटेल सुरू करण्याविषयी विचारणा होते, परंतु आता व्यवसाय सुरू झाला तरी कोरोनाची भीती आहेच. कोण ग्राहक कोरोनाग्रस्त आणि कोण नाही, हे ओळखायचे कसे? कोरोनाचे संकट लवकर दूर होवो, अशी प्रार्थनाही संदीप जाधव करतात.