नाशिकमधील ‘रामशेज’ सर केला अन् मंदिरात दर्शन घेताना हार्ट ॲटॅक आला!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 06:55 PM2022-07-30T18:55:44+5:302022-07-30T18:56:19+5:30
पावसाळी पर्यटनाचा हंगाम असल्याने शनिवारच्या सुटीमुळे सिडकोतील शिवपुरी चौकात राहणारे सरोवर कुटुंब शहराच्याजवळ असलेल्या रामशेज किल्ल्यावर भटकंतीसाठी गेले होते.
नाशिक :
पावसाळी पर्यटनाचा हंगाम असल्याने शनिवारच्या सुटीमुळे सिडकोतील शिवपुरी चौकात राहणारे सरोवर कुटुंब शहराच्याजवळ असलेल्या रामशेज किल्ल्यावर भटकंतीसाठी गेले होते. यावेळी अजय नारायण सरोवर (२०) याला चक्कर आली आणि तो किल्ल्याच्या माथ्यावर कोसळला. त्यास त्याचे काही मित्र, नातेवाईक यांनी उचलून खाली आणले व जवळच्या रुग्णालयात दाखल केले; मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यु झाला. या घटनेने शिवपुरी चौक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सिडको येथील उत्तमनगर शिवपुरी चौकात राहणारे सरोवर कुटुंबीय हे शनिवारी दुपारी नातेवाईक व मित्रपरिवारासह रामशेज किल्ल्यावर गेले होते. किल्ला चढून गेल्यानंतर अजय याने मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर मात्र अजयला काहीसे अस्वस्थत वाटू लागले आणि चक्कर आली. यानंतर त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेले असता त्यास वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.
अजय हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. शनिवारी दुपारी अजय हा त्याचे नातेवाईक व मित्र परिवारासह रामशेज किल्ल्यावर गेला होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिणी असा परिवार आहे. अजयचे वडील हे सिडको परिसरात फळविक्रीचा व्यवसाय करतात. अजयच्या अशा अचानकपणे झालेल्या मृत्युने हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, गड-किल्ल्यांची चढाई करत असताना अधिकाधिक सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. सवय नसल्यास टप्प्याटप्प्याने विश्रांती घेत गड, किल्ले चढावे, अन्यथा दुर्ग भ्रमंती टाळलेली बरी, असे गिर्यारोहकांचे म्हणणे आहे. कोणताही गड, किल्ला चढण्यापुर्वी त्याच्या वाटेची अवस्था व गडाची उंची आदी माहिती जाणून घ्यावी. तसेच गड भ्रमंती करताना घ्यावयाची खबरदारी याबाबत उदासिनता दाखवू नये, असे गिरी भ्रमंती करणाऱ्या दुर्गप्रेमींनी सांगितले.