मृत्यूच्या दाढेतून सुटून तरुण आता निरोगी
By admin | Published: May 31, 2015 01:26 AM2015-05-31T01:26:15+5:302015-05-31T01:26:32+5:30
मृत्यूच्या दाढेतून सुटून तरुण आता निरोगी
नाशिक : वारंवार गुटख्याचे सेवन केल्याने वयाच्या बाविसाव्या वर्षीच त्याला मुख कर्करोगाने गाठले... ते समजल्यावर त्याच्या कुटुंबीयांनीच नव्हे, तर पत्नीनेही त्याला बाजूला टाकले... त्याच्या साथीला होती फक्त त्याची वृद्ध आई... या दोघांनी मिळून जिवघेण्या कर्करोगाला माघारी धाडले... मृत्यूच्या दाढेतून सुटून आलेला हा तरुण आता चारचौघांसारखेच निरोगी आयुष्य जगत आहे... तंबाखू न खाण्याच्या निग्रहासह...मालेगाव येथील एका तरुणाची ही कहाणी आहे. प्रचंड प्रमाणात गुटखा खात असल्याने या तरुणाच्या तोंडात जखम झाली, चट्टे पडले. डॉक्टरांकडे तपासणी केली असता, त्याला वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षी मुख कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले. वयाच्या विसाव्या वर्षीच विवाह झालेला; पण त्याच्या आजाराविषयी कळताच कुटुंबीयांसह पत्नीनेही त्याच्याशी बोलणे बंद केले. त्याला कोणी जवळही फिरकू देईनासे झाले. या साऱ्यातून निराश झालेल्या तरुणाने आपल्या वृद्ध आईसह नाशिक गाठले.
येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात त्याच्यावर मोफत उपचार करण्यात आले. तज्ज्ञांनी त्याचे समुपदेशनही केले. काही महिन्यांनी हा तरुण आजारातून पूर्णपणे बाहेर आला. आता या घटनेला तीन वर्षे उलटली आहेत. हा तरुण आता सुखेनैव आयुष्य जगत आहे... पण या सर्वांतून त्याला धडा मिळाला आहे तो तंबाखू न खाण्याचा. गुटखा, सिगारेट, विडी, तंबाखू, खैनी, पान, तपकीर, मिस्री या माध्यमांतून तंबाखू सेवन करणाऱ्यांना सर्वाधिक धोका असतो तो मुख कर्करोगाचा. पन्नास टक्के व्यक्तींना मुख कर्करोग होण्यास तंबाखू कारणीभूत असते. स्त्रियांमध्ये हे प्रमाण १६ ते १७ टक्के आहे. महाराष्ट्रात तंबाखू सेवन करणाऱ्यांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या २८ ते ३० टक्के म्हणजे सुमारे दोन ते सव्वादोन कोटी इतके आहे. तंबाखू सेवनातून फुफ्फुस, अन्ननलिका, आतडे, जठर आदि अवयवांचेही कर्करोग होत असले, तरी मुख कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. महाराष्ट्रात गुटखाबंदी असूनही तिची अंमलबजावणी कठोर रीतीने होत नाही. शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटरच्या परिसरात गुटखा विक्रीची दुकाने नसावीत, असाही नियम आहे. मात्र त्याचेही पालन होत नाही.
या पार्श्वभूमीवर मालेगावमधील या तरुणाचे उदाहरण अनेकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे आहे. (प्रतिनिधी)