खंबाळे येथे शेततळ्यात बुडून युवतीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2022 01:45 AM2022-05-30T01:45:52+5:302022-05-30T01:46:13+5:30
सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे शेततळ्यात बुडून अभियांत्रीकी पदवीधारक असलेल्या युवतीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.२९) सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. सोनल भाऊसाहेब आंधळे (२४) रा. खंबाळे, ता. सिन्नर असे मृत तरुणीचे नाव आहे.
सिन्नर : तालुक्यातील खंबाळे येथे शेततळ्यात बुडून अभियांत्रीकी पदवीधारक असलेल्या युवतीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.२९) सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. सोनल भाऊसाहेब आंधळे (२४) रा. खंबाळे, ता. सिन्नर असे मृत तरुणीचे नाव आहे.
खंबाळे येथे भाऊसाहेब किसन आंधळे हे पत्नी मंदाकिनी, मुलगा विशाल व मुलगी सोनल यांच्यासह शेती करतात. त्यांचे गट नं. ४७९ मध्ये शेततळे आहे. रविवारी सकाळी भाऊसाहेब आंधळे व मुलगी सोनल हे शेतावर शेततळ्यात पाणी किती आहे हे पाहण्यासाठी गेले होते. काही वेळानंतर मुलगी सोनलने वडिलांना तुम्ही घरी जा, मी थोडा वेळ थांबते असे सांगितले. त्यांनतर भाऊसाहेब घरी निघून आले. काहीवेळाने सोनल घरी न परतल्याने भाऊसाहेब यांनी शेतात जाऊन पाहिले असता ती दिसली नाही. त्यामुळे त्यांनी शोध घेतला असता मुलगी सोनल शेततळ्यात बुडाल्याचे दिसून आले. भाऊसाहेब आंधळे यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मदतीसाठी बोलावले. नामदेव रामनाथ आंधळे, प्रवीण विलास आंधळे यांनी धाव घेत शेततळ्यात उतरून सोनलला पाण्याबाहेर काढत खासगी वाहनातून दोडी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणले. उपचारादरम्यान सोनलचा मृत्यू झाला. वडील भाऊसाहेब आंधळे यांनी नांदूरशिंगोटे पोलीस दूरक्षेत्रात जाऊन घटनेची माहिती दिली. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.