युवती ठार : गतिरोधकावर वेग कमी केला अन् काळाने झडप घातली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2020 08:00 PM2020-10-25T20:00:11+5:302020-10-25T20:01:40+5:30
दिवटे कुटुंबीयांची अनुष्का ही मोठी मुलगी होती. तिच्या वडिलांचे तीन वर्षांपूर्वी अपघातात निधन झाले आहे. वडिलांचा पाठोपाठ मुलीवरही काळाने अशी झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील सेंट झेव्हियर शाळेसमोरील गतिरोधकावर दुचाकीचा वेग कमी करताच पाठीमागून आलेल्या ट्रकने दुचाकीस्वार युवतीला जोरदार धडक दिली. या धडकेत युवती रस्त्यावर कोसळून ट्रकच्या चाकांखाली सापडून जागीच ठार झाली. दसऱ्याच्या दिवशी झालेल्या या अपघाताने हळहळ व्यक्त होत आहे. अनुष्का रवींद्र दिवटे (१९) असे मृत्युमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे.
नाशिकरोड गुरुद्वारामागील विद्याविहारनगर येथील पद्मावती सोसायटीत राहणारी अनुष्का ही रविवारी दुपारी द्वारका येथे आपल्या आजोबांच्या घरी गेली होती. तेथून ४ वाजेच्या सुमारास नाशिकरोडच्या दिशेने अक्टिवा मोपेड दुचाकीने (एम.एच १५ डी-झेड ७९५६) घरी निघाली होती. यावेळी नेहरूनगर सेंट झेव्हियर शाळेसमोर महामार्गावर टाकलेल्या गतिरोधक ओलांडताना अनुष्काने दुचाकीचा वेग कमी केला. याचवेळी पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रक (क्र. एमएच २४ एफ ९७८६) चालकाने दुचाकीला जोराची धडक दिली. यामुळे ती खाली कोसळली आणि ट्रकच्या चाकांखाली सापडून गतप्राण झाली. ट्रकचे चाक हेल्मेटवरून गेल्याने हेल्मेटचा चक्काचूर झाला होता. अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळी न थाबंता नाशिकरोडच्या दिशेने ट्रकसोबत पळ काढला. मात्र पादचारी नागरिकांनी तत्काळ पोलिसांना अपघाताची खबर दिल्याने नाशिकरोड पोलिसांनी त्वरित ट्रकचालक उमेश सुभाष वकोरे (३८,रा. ढोकी, उस्मानाबाद) याला पोलीस ठाण्याजवळ ट्रकसह ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत अनुष्का हिच्या पश्चात आई, लहान भाऊ आहे. दिवटे कुटुंबाची ती एकुलती एक मोठी मुलगी काळाने हिरावल्याने त्यांच्यावर आभाळ फाटले.
वडिलांपाठोपाठ मुलीचाही अपघाती मृत्यू
दिवटे कुटुंबीयांची अनुष्का ही मोठी मुलगी होती. तिच्या वडिलांचे तीन वर्षांपूर्वी अपघातात निधन झाले आहे. वडिलांचा पाठोपाठ मुलीवरही काळाने अशी झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दिवटे कुटुंबीय व त्यांच्या नातेवाइकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पद्मावती सोसायटी परिसरात या घटनेमुळे शोककळा पसरली होती.