चांदोरीतील तरुणाचा नदीत बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 12:48 AM2019-04-02T00:48:57+5:302019-04-02T00:50:49+5:30
चांदोरी येथील बसस्थानकाजवळ राहणाऱ्या समाधान देवराम सांबरे (२३) या तरुणाचा विठ्ठलवाडी शिवारात गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला.
चांदोरी : येथील बसस्थानकाजवळ राहणाऱ्या समाधान देवराम सांबरे (२३) या तरुणाचा विठ्ठलवाडी शिवारात गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. समाधान ३१ मार्च रोजी सुमारे ४ वाजेच्या सुमारास आपल्या शेळ्या चारण्यासाठी घेऊन नदीकाठाने निघाला होता. तो विठ्ठलवाडी शिवारात पोहोचला. तेथे शेळ्या चरत असताना त्यांना पाणी आणण्यासाठी तो नदीकडे गेला आणि तोल जाऊन पाण्यात पडला.
सोमवारी सकाळी शुभम गारे व इतर मित्र समाधानचा शोध घेण्यासाठी विठ्ठलवाडी शिवारात गेले असता मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला. त्यांनी तत्काळ सायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांच्याशी संपर्क करून मृतदेहाबद्दल माहिती दिली. घटनेची दखल घेत पोलीस कर्मचारी बांगरकर, चांदोरीचे पोलीसपाटील अनिल गडाख तसेच चांदोरी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या शुभम गारे, फकिरा धुळे, बाबाजी डगळे, रघुनाथ सांबरे, एकनाथ सांबरे, बाळू चौधरी, सागर गडाख, राजू टर्ले यांनी धाव
घेऊन मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली.
मृतदेहाची ओळख पटवून मृतदेह समाधानचा असल्याची खात्री झाली. पोलिसांनी पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रु ग्णालय निफाड येथे पाठविण्यात आला. समाधानच्या पश्चात वृद्ध आई व तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे.
जन्मत: अपंग
समाधान हा जन्मत: अपंग असल्याने त्याचे हात सरळ नव्हते. यामुळे पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. सांयकाळी झाली तरी समाधान घरी का आला नाही याची मित्र व आई चौकशी करू लागले. परंतु त्याचा शोध लागला नाही.