चांदवडला कोविड सेंटर बाहेरच युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 01:01 PM2021-04-21T13:01:11+5:302021-04-21T13:01:45+5:30
चांदवड ( नाशिक) : येथील ट्रामा केअर सेंटरमधील कोविड सेंटरमध्ये तपासणीसाठी आलेल्या युवकाचा रूग्णालयाच्या बाहेरच मृत्यू झाला.
चांदवड ( नाशिक) : येथील ट्रामा केअर सेंटरमधील कोविड सेंटरमध्ये तपासणीसाठी आलेल्या युवकाचा रूग्णालयाच्या बाहेरच मृत्यू झाला. चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव जवळील दीड किलोमीटर अंतरावरील खंडाळवाडी येथील अरुण उत्तम माळी ( ३५ ) हा मंगळवार दि . २० एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पत्नी सुरेखा हिचे बरोबर चांदवड येथील ट्रामा केअर सेंटरमधील कोविड सेंटर येथे तब्बेत बरी नसल्याने तपासणीसाठी आला. रुग्णालयातील डॉक्टरांनी बेड शिल्लक नसल्याने बेड उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला. माळी यांची ऑक्सीजन लेव्हल अगदी ३० ते ३५ पर्यंतच होती . त्यामुळे हा रुग्ण कोविड सेंटरच्या पायरीजवळ कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात स्ट्रेचरवर नेऊन डॉ . सोनवणे यांनी तपासणी केली. तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली. हा रुग्ण गेल्या पाच ते सहा दिवसापासून आजारी असल्याचे परिसरात बोलले जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सुरेखा, मुलगी आरती सध्या इयत्ता नववीत आहे . तर मुलगा आदित्य इयत्ता आठवीत आहे.
-------------------
रूग्ण गंभीर अवस्थेत
कोरोना रुग्ण हा वेळेंत रुग्णालयात आला व तपासणी केली व औषध उपचार घेतले तर बरा होतो. हा रुग्ण अतिशय गंभीर अवस्थेत आल्याने हा प्रकार घडला. शेवटी डॉक्टर पण देव नाही. याकरिता थोडी लक्षणे असतांना रुग्णांनी आजार न लपविता वेळेत औषध उपचार घेणे गरजेचे आहे.
- डॉ . सुशीलकुमार शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी, चांदवड