युवक महोत्सव : नाशिक ब्रॅण्डिंगसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी
By Sandeep.bhalerao | Published: January 10, 2024 04:10 PM2024-01-10T16:10:51+5:302024-01-10T16:11:19+5:30
राष्ट्रीय युवक महोत्सवानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १२ जानेवारी रोजी नाशिक शहरात दाखल होत आहेत.
नाशिक: राष्ट्रीय युवक महोत्सवासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या युवकांमध्ये नाशिकचे ब्रॅण्डिंग करण्याची संधी असल्याने त्यादृष्टीने प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. राष्ट्रीय युवक महोत्सवानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १२ जानेवारी रोजी नाशिक शहरात दाखल होत आहेत. त्यामुळे या महोत्सवाला मोठे महत्त्व प्राप्त झाले असून महोत्सवात २२ देशातील सुमारे साडेसात हजार युवक सहभागी होणार आहेत.
देशाच्या कानाकोपऱ्यातून नाशिकमध्ये येणाऱ्या युवकांना महाराष्ट्र आणि पर्यायाने नाशिकच्या संस्कृतीची ओळख व्हावी, यासाठी दक्षता घेण्यात आली आहे. रेल्वेस्थानकावर उतरणाऱ्या युवकांचे पारंपरिक स्वागत केले जाणार आहेच, याशिवाय त्यांना नाशिकची ओळख अधोरेखित करणारे वेलकम गिफ्ट देखील दिले जाणार आहे.
हजारोंच्या संख्येने नाशिकमध्ये पाच दिवस हे युवक ठिकठिकाणी थांबणार असल्याने त्यांच्यासाठी खासगी वाहनांची वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. या वाहनांवरील चालकांना पाहुण्यांशी कसे वागावे, बोलावे याबाबतचे प्रशिक्षण दिले जात आहे. नाशिकमध्ये पहिले पाऊल ठेवणाऱ्यांना इतर राज्यांमधील तरुणांसमोर नाशिकचे आदरातिथ्य सुयोग्य पद्धतीने व्हावे आणि त्या माध्यमातून नाशिकचे ब्रॅण्डिंग होणार असल्याने चालकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याच कारणास्तव चालकांना प्रशिक्षित केेले जात असल्याची माहिती क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांनी सांगितले.