नायलॉन मांजामुळे युवक जखमी
By admin | Published: December 28, 2016 01:35 AM2016-12-28T01:35:46+5:302016-12-28T01:35:58+5:30
नायलॉन मांजामुळे युवक जखमी
सिडको : येथील शिवशक्ती चौकातून कामावर जात असलेल्या तरुणाच्या गळ्यास नायलॉन मांजामुळे दुखापत झाली आहे. नायलॉन मांजावर बंदी असतानाही सिडकोत सर्रासपणे विक्रेत्यांकडून नायलॉन मांजाची विक्री केली जात असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
नायलॉन मांजावर बंदी असतानाही यंदा शहरात मांजाची सर्रास विक्री सुरू असून त्याचे दुष्परिणाम जाणवण्यास सुरूवात झाली आहे. मंगळवारी सावतानगर येथील गौरव कृष्णा कोठावदे हा युवक कामावर जात होता. याचदरम्यान त्यांच्या गळ्यावर नायलॉन मांजा घासला गेल्याने गंभीर दुखापत झाली. सुदैवाने कोठावदे याने डोक्यात हेल्मेट घातलेले असल्याने गंभीर इजा टळली. नायलॉन मांजा गळ्याजवळ आल्यानंतर कोठावदे हा दुचाकीवरून खाली पडला. या प्रकारामुळे मांजावरील बंदी कागदोपत्रीच असल्याचे दिसत असून प्रशासनाने मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)