बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी
By admin | Published: March 10, 2017 01:25 AM2017-03-10T01:25:12+5:302017-03-10T01:25:25+5:30
बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यातील राहुलनगर येथे शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने येथील युवकावर हल्ला केल्याने तो जखमी झाला.
बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यातील बारशिंगवे परिसरातील राहुलनगर येथे गेल्या दोन-तीन दिवसांपासून बिबट्याने दहशत माजवली असून, शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने येथील युवकावर हल्ला केल्याने तो जखमी झाला.
राहुलनगर येथील गणपत नवसू भले (२३) हा युवक सकाळी ७ वाजेच्या सुमारास शेतीच्या कामासाठी जात असताना बिबट्याने अचानक हल्ला करून पायाला चावा घेतला. त्याने आरडाओरडा केल्याने ग्रामस्थांनी धाव घेताच बिबट्याने पलायन केले.
इगतपुरीच्या वनविभागाला येथील माजी सरपंच गुलाब भले यांनी तत्काळ ही घटना कळविली. यावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, वनपरिमंडल अधिकारी जी. आर. जाधव, वनरक्षक आर. टी. पाठक यांनी ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने सदर युवकास घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, येथील आदिवासी भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये बिबट्याच्या मुक्त संचारामुळे प्रचंड भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी या परिसरात बिबट्याचे दर्शन होत असल्याने व येथील युवकावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
वनविभागाने याबाबत तत्काळ पाऊले उचलण्याची व ज्या ज्या भागात बिबट्यांचा मुक्त संचार आहे त्या ठिकाणी प्रामुख्याने पिंजरे लावण्याची मागणी माजी सरपंच गुलाब भले, शिवाजी धोंगडे, अशोक बोराडे, पांडुरंग बोराडे, भगवान भले, हिरामण भले, सोमनाथ आगिवले, अमोल बोराडे आदिंनी केली आहे.