पेट्रोल उशिरा आणल्याच्या किरकोळ कारणावरून सातपूरला युवकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 06:04 PM2018-12-17T18:04:01+5:302018-12-17T18:41:39+5:30
नाशिक : दुचाकीतील पेट्रोल संपल्याने मित्रांना फोन करून सांगितलेले पेट्रोल उशिरा आणल्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून युवकावर वार करून खून केल्याची घटना रविवारी (दि़१६) मध्यरात्रीच्या सुमारास सातपूर औद्योगिक वसाहतीतील सिएट कंपनीजवळ घडली़ अमोल अशोक बागले (२३, शिवाजीनगर, सातपूर, नाशिक) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे़
नाशिक : दुचाकीतील पेट्रोल संपल्याने मित्रांना फोन करून सांगितलेले पेट्रोल उशिरा आणल्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून युवकावर वार करून खून केल्याची घटना रविवारी (दि़१६) मध्यरात्रीच्या सुमारास सातपूर औद्योगिक वसाहतीतील सिएट कंपनीजवळ घडली़ अमोल अशोक बागले (२३, शिवाजीनगर, सातपूर, नाशिक) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे़ या प्रकरणी सातपूर पोलीस खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघा संशयितांना अटक केली आहे़ दरम्यान सातूपर परिसरात आठवडाभरात दोन तरुणांच्या खूनाच्या घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे़
सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीच्या वाहनावर अमोल बागले हा चालक म्हणून कामास होता. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीवरून घरी परतत असताना सीएट कंपनीजवळ त्याच्या दुचाकीतील पेट्रोल संपले. त्यामुळे त्याने मित्र संशयित सुनील पंडीत खरात (२१), लोकेश अशोक थोरात (१८), किरण मधुकर बिन्नर (१९, तिघेही रा़ साईबाबानगर चौक, शिवाजीनगर, सातपूर) यांना फोन करून पेट्रोल आणण्यास सांगितले़ त्यानुसार तिघेही पेट्रोल घेऊन गेले मात्र त्यांना येण्यास उशिर का झाला या कारणावरून अमोल बागले याने शिवीगाळ केली व एकाच्या कानशिलातही लगावली़
या प्रकारामुळे संतापलेल्या तिघाही संशयित मित्रांनी अमोल बागले यास जबर मारहाण केली. तर एकाने त्याच्याकडील धारदार हत्यार काढून पोटात भोसकले. यानंतर बागलेच्या पोटातून रक्तस्त्राव होऊ लागल्याने या तिघा मित्रांनी त्यास दुचाकीवर बसवून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात प्रथम जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ मात्र सोमवारी पहाटेच्या सुमारास अमोल बागले याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.
या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केल्याने तणाव निर्माण झाला होता़ दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस व राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली होती़ तसेच पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील, शांताराम पाटील, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ट पोलीस निरीक्षक अशोक भगत, सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली़