उपनगरला युवकाचा खून

By admin | Published: September 26, 2015 12:12 AM2015-09-26T00:12:36+5:302015-09-26T00:13:09+5:30

परिसरात तणाव : रास्ता रोको; जिल्हा रुग्णालयात गोंधळ

Youth murdered in suburb | उपनगरला युवकाचा खून

उपनगरला युवकाचा खून

Next

नाशिकरोड/उपनगर : उपनगर येथील महाराष्ट्र हायस्कुलजवळ गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास पाच जणांच्या टोळक्याने योगेश पवार या युवकावर सपासप वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली. या हल्यात मयत युवकाचे दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संशयितांना त्वरित गजाआड करण्यात यावी या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी उपनगर नाक्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. जिल्हा रूग्णालयातही काहीकाळ गोंधळ निर्माण झाला होता.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपनगर नवीन चाळ येथील रहिवीसी योगेश शुद्धोधन पवार (वय २३), किरण चंद्रकांत सुरवाडे रा. पांचाली अपार्टमेंट, सुरज विजय पगारे रा. उपनगर भाजी मार्केट हे तिघे मित्र गुरूवारी रात्री नाशिकरोड परिसरातील गणपती बघून रात्री ११.३० च्या सुमारास घरी जात होते. उपनगर महाराष्ट्र हायस्कुल शेजारील लोकराज प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडपाजवळ संशयित अक्षय चावरिया, सनी लोट हे दोघे जण उभे होते. यावेळी त्यांनी तीन-चार दिवसांपूर्वी किरण सुरवाडे याचा भाऊ शिवा व शेखर पाटोळे यांच्यासोबत झालेल्या वादाची कुरापत काढून योगेश पवार याच्याशी वाद घातला. वाद विकोपाला गेल्याने त्यांनी योगेशला मारहाण करण्यास सुरूवात केली. सदर भांडण सोडविण्यास गेलेले किरण सुरवाडे व सुरज पगारे यांना देखील शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. याचवेळी पल्सर क्र.(एमएच १५ ईआर ००२४) दुचाकीवर आलेल्या रिंकु सुनसुना, मुकेश मोहिते यांनी देखील योगेशला मारहाण करण्यास सुरूवात केली. संशयित अक्षयचे वडिल दीपक चावरिया हे देखील त्या ठिकाणी येऊन योगेशला शिवीगाळ करू लागले. संशयितांनी योगेशच्या पोटावर, छातीवर, डोक्यात, हाता-पायावर चाकुने सपासप वार करून गंभीर जखमी केले. तर सुरज पगारे याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच किरण सुरवाडे याच्यावर देखील वार करून गंभीर जखमी केले. मदतीसाठी जखमींनी आरडाओरड केली असता काही युवक, रहिवासी धावत आले. मात्र संशयितांनी सर्वांना चाकुचा धाक दाखवून दहशत माजवत पळून गेले.
गंभीर जखमी अवस्थेत योगेश याला उपचाराकरिता रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तत्पुर्वीच तो मयत झाला.
घटनेनंतर दुसऱ्या दिवशी संतप्त जमावाने उपनगर नाक्यावर नाशिक-पुणेरोडवर रास्तारोको आंदोलन करीत हल्लेखोरांना ताब्यात घेण्याची मागणी केली. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. संश्यितांना ताब्यात घेतल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने जिल्हा रूग्णालयातही तणाव निर्माण झाला होता.
मध्यरात्री टोळक्याच्या हल्ल्यात योगेशचा खून झाल्याचे वृत्त समजताच घटनास्थळी मोठी गर्दी जमल्याने तणावाचे वातावरण पसरले होते. परिसरात तत्काळ बंदोबस्त तैनात करण्यात आला. याप्रकरणी पाचही संशयितांविरूद्ध उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, दंगल आदि कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)

Web Title: Youth murdered in suburb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.