सुतारखेडेत युवकाचा खून

By admin | Published: March 13, 2016 10:35 PM2016-03-13T22:35:51+5:302016-03-13T22:43:17+5:30

मनोरुग्ण : उपद्रवी ठरत असल्याने काटा काढल्याचा संशय

Youth murdered in Sutarkheda | सुतारखेडेत युवकाचा खून

सुतारखेडेत युवकाचा खून

Next

चांदवड (महेश गुजराथी) : तालुक्यातील सुतारखेडे येथील रामदास रुंझा निकम (३४) हा तरुण मृतावस्थेत आढळल्याची खबर चांदवड पोलिसांना मिळताच त्यांनी सुतारखेडे गाव गाठले मृताच्या अंगावरील जखमांवरून त्याचा खून झाल्याचे लक्षात येताच याबाबत अधिक चौकशी करता मृताचा भाऊ व अन्य तीन जणांनी खून केल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येताच त्या चौघांना ताब्यात घेतले असून, खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुतारखेडे येथील रामदास रुंझा निकम (३४) हा तरुण त्याच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्याची खबर चांदवड पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस निरीक्षक अनंत मोहिते, पोलीस उपनिरीक्षक कैलास चौधरी, हेमंत कदम, पी. एम. खैरनार व पोलीस कर्मचारी घटनास्थळी गेले तेथे मयताची पाहणी केली असता त्यांच्या अंगावर गंभीर स्वरूपाच्या जखमा असल्याने त्याचा खून झाला असण्याची दाट शंका आल्याने चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांनी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय मोहिते, मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासणे, मनमाड विभागाचे उपअधीक्षक डॉ. राहुल खाडे यांना घटनेची माहिती भ्रमण ध्वनीवरून दिली. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनावरून मयत रामदास रुंझा निकम याची आई श्रीमती वत्सलाबाई रुंझा निकम (६५) यांनी फिर्याद दिली की, रामदास याचे लग्न २००७ मध्ये झाले त्यानंतर लगेच ८ महिन्यांत पत्नीशी न पटल्याने घटस्फोट घेतला. त्यामुळे रामदास तेव्हापासून वेडसरपणा करु लागला व कोणासही विनाकारण मारहाण करत असे किंवा दगड फेकून मारत असे. सन २०११ मध्ये त्याचा भाऊ नागेश रुंझा निकम याचा मुलगा चि. राहुल यास रामदास याने विहिरीत फेकून दिले होते. मात्र परिसरातील नागरिकांनी त्यास वाचविले. रामदास याच्याविरुद्ध भाऊ नागेशने फिर्याद दिली होती व त्यावेळी रामदास रुंझा निकम यास अटक झाली, मात्र कोर्टातून जामीन करून त्यास आम्हीच सोडवून आणले होते. परंतु तो तरीही सुधारला नाही. तो पुन्हा जास्तच वेडापणा करून लागला रामदासची आई वत्सलाबाई यांनाही खूपच त्रास देत असे. तो मुलगा असल्याने त्यास जेवण देत होते. तो कधी कधी घरात पाच ते सहा दिवस झोपून राहत असे. घराजवळून कोणी गेले तर तो दगड फेकून मारत असे. आई जेवण देण्यास गेली तरी तिलाही मारत असे. दि. १२ मार्च १६ रोजी सुतारखेडे गावी असताना त्याचा मोठा भाऊ नागेश हा घरी आला व रामदास याचे घराचे खिडकीतून पाहिले असता पलंगावर पडलेला होता. त्याचे हाताच्या दंडाजवळ रक्त निघून त्यास मुंग्या लागलेल्या होत्या. डोक्यासही मार लागला होता.
शरीराची हालचाल नसल्याने तो मयत अवस्थेत होता. पोलिसांनी श्रीमती वत्सलाबाई निकम यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा केला व अधिक तपास केला असता मयत रामदास निकम याचा भाऊ नागेश रुंझा निकम (४१) यांच्याकडे पोलिसी खाक्या दाखवित चौकशी केली असता, नागेश निकम याने त्यांचा मित्र योगेश अंबादास गांगुर्डे, (२५) सुयोग उर्फ मनोज तुकाराम गांगुर्डे (२३) (दोघे रा. सुतारखेडे), संदीप तुळशीराम पवार (२४) (रा. कळमदरे) यांच्या मदतीने मला होणाऱ्या त्रासामुळे त्याचा काटा काढल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी या चौघांनाही ताब्यात घेतले असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक अनंत मोहिते, हेमंत कदम, पी. एम. खैरनार व पोलीस करीत आहेत.

Web Title: Youth murdered in Sutarkheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.