नाशिक महानगरपालिकेला युवा धोरण मसुदा सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:52 AM2019-01-21T00:52:47+5:302019-01-21T00:53:15+5:30
शहरात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नाशकातील काही तरुणांनी युवा समन्वय समितीच्या माध्यमातून तरुणांच्या विकासात्मक दृष्टीने युवा धोरण अहवालाचा मसुदा तयार करून शनिवारी (दि.१९) महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना सादर केला आहे.
नाशिक : शहरात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नाशकातील काही तरुणांनी युवा समन्वय समितीच्या माध्यमातून तरुणांच्या विकासात्मक दृष्टीने युवा धोरण अहवालाचा मसुदा तयार करून शनिवारी (दि.१९) महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना सादर केला आहे.
युवक ही देशाची खरी शक्ती असल्याने त्यांच्यात राष्ट्रीयत्व, सामाजिक सहिष्णुता निर्माण होण्यासाठी तसेच त्यांना नव्या युगाची आव्हाने पेलण्यासाठी तत्पर बनविण्याच्या उद्देशाने विभागसभेत २२ आॅगस्ट २०१४ लाच युवा धोरण सादर करण्यात आले होते. युवकांसमोरील वाढत्या बेकारीच्या समस्येसोबत गुन्हेगारी आणि व्यसनाधिनता अशा समस्या उभ्या राहत आहेत. या समस्यांवर मात करून युवकांना नवी दिशा देण्याच्या उद्देशाने युवकांना सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवर तरुणांच्या विकासासंदर्भात विचार करीत युवा समन्वयक समितीतर्फे नाशिक महानगरपालिकेला हा अहवाल सादर करण्यात आला आहे.
युवा धोरणाविषयी विविध उपाययोजना असलेला मसुदा अहवाल स्वरूपात युवा समन्वय समितीचे भूषण काळे, देवांश जोशी, प्रशांत खैरे, रवि जन्नवार, प्रफुल्ल वाघ, सिद्धांत बर्वे, युगंधर दोंदे, प्रशांत मदाणे, कमलेश काळे आदींनी महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना सादर केला आहे.
या अहवालाच्या मसुद्यात महानगरपालिका सभागृह युवा मंडळांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून देणे, अभ्यासिकांच्या संख्येत वाढ करणे, युवा पुरस्कार, मनपा समुपदेशन केंद्र, कुस्ती पोर्च, मैदानांची उपलब्धता, मुलींसाठी वसतिगृहांची निर्मिती, रोजगार मेळावा आणि अन्य मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला आहे.