मालेगाव येथील गिरणा नदीपात्राची स्वच्छता करताना सोयगाव येथील तरुण.
By admin | Published: October 31, 2014 10:25 PM2014-10-31T22:25:26+5:302014-10-31T22:25:48+5:30
सोयगावच्या तरुणांची स्वच्छता मोहीम
मालेगाव : देशात सुरू करण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत अभियान’ पासून स्फूर्ती घेऊन सोयगाव - टेहरे दरम्यानच्या गिरणा नदीपात्राची स्वच्छता सोयगावातील तरुणांनी केली.
गिरणानदीवरील टेहरेलगतच्या एकलव्य पुलानजिक गणेशोत्सव व नवरात्रौत्सवानंतर गणेश व देवीमुर्तीचे विसर्जन मोठ्या प्रमाणावर करण्यात आले होते. सोबतील निर्माल्य व इतर कचऱ्याच्या प्लास्टिक पिशव्या टाकण्यात आल्या होत्या. मात्र आता गिरणानदीतील पूरपाणी ओसरल्यानंतर ही सर्व घाण पात्राजवळ जमा होऊन परिसरात मोठी दुर्गंधी पसरली होती. तसेच देवदेवतांच्या मुर्तींची हेळसांड दिसून येत होती. निर्माल्यातील घाणीतून विविध प्रकारचे डासकिटक यांचा नदीपात्रात तसेच सोयगाव व टेहरे गावालगत मोठ्या प्रमाणात फैलाव झाला होता. यासंदर्भात मनपा प्रशासनाकडे स्वच्छतेची मागणी करूनदेखील त्याकडे दुर्लक्ष केले गेले.
त्यामुळे सोयगावचे माजी सरपंच ताराचंद बच्छाव व माजी सरपंच जयप्रकाश बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली तरुणांनी मनपा प्रशासनाची मदत न घेता स्वच्छता मोहिम राबवली. हा सर्व नदीकिनाऱ्यालगतचा कचरा जमा करून तो ट्रॅक्टरने वाहून नेऊन त्याची विल्हेवाट लावण्यात आली. (प्रतिनिधी)