तरुणाई गरब्यात दंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:53 AM2017-09-26T00:53:01+5:302017-09-26T00:53:06+5:30
नवरात्रोत्सव म्हटला की तरुणाईचा सळसळता उत्साह रास दांडियाच्या कार्यक्रमात ओसंडून वाहताना दिसून येत आहे. पारंपरिक राजस्थानी-गुजराती पोशाखात तरुण-तरुणींकडून गरबा-दांडिया खेळला जात आहे.
नाशिक : नवरात्रोत्सव म्हटला की तरुणाईचा सळसळता उत्साह रास दांडियाच्या कार्यक्रमात ओसंडून वाहताना दिसून येत आहे. पारंपरिक राजस्थानी-गुजराती पोशाखात तरुण-तरुणींकडून गरबा-दांडिया खेळला जात आहे. गंगापूररोडवरील नंदनवन लॉन्स, पंचवटीमधील गुजराती समाजाच्या वसाहतीमध्ये तसेच उंटवाडी येथील ठक्कर डोम, राणेनगर, सिडको, नाशिकरोड परिसरात रास दांडिया रंगात आला आहे. नवरात्रोत्सव सुरू होऊन पाच दिवस पूर्ण झाले आहे. अखेरच्या टप्प्यात आलेल्या या उत्सवानिमित्त तरुणाई गरबा नृत्यात दंग होताना दिसून येत आहे. विविध नवरात्री स्पेशल हिंदी-मराठी, गुजराथी गीतांवर तरुणाईची पावले थिरकत असून, मनमुराद आनंद लुटताना तरुण-तरुणी दिसून येत आहे. पंचवटी परिसरातील दिंडोरी नाक्यावरील कच्छी लोहाणा महाजनवाडी परिसरातही सालाबाद प्रमाणे रास दांडियाचा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी गुजराती समाजाच्या तरुण-तरुणींकडून उत्साहात गरबा उत्सव साजरा केला जात आहे. तसेच सरदार चौकामधील खिमजी भगवानजी धर्मशाळेमध्येही दोन दिवस दांडियांचा उत्सव रंगला होता. तसेच हिरावाडी आणि तपोवन परिसरातही रास दांडियांचा जल्लोष पहावयास मिळत आहे. तरुणी चनीया-चोळी, तर तरुणदेखील केडियू पोशाख परिधान करून गरब्याचा आनंद घेत आहे.