नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यात युवक गेला वाहून; पहाटेपासून शोधकार्य युद्धपातळीवर सुरू 

By अझहर शेख | Updated: July 17, 2023 14:04 IST2023-07-17T14:04:17+5:302023-07-17T14:04:25+5:30

देवळाली कॅम्प सह्याद्रीनगरमधील रहिवासी असलेले चौघे मित्र रविवारच्या सुटीमुळे पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी त्र्यंबकेश्वरला गेले.

Youth washed away in Dugarwadi Falls of Nashik; The search operation started on war footing from early morning | नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यात युवक गेला वाहून; पहाटेपासून शोधकार्य युद्धपातळीवर सुरू 

नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यात युवक गेला वाहून; पहाटेपासून शोधकार्य युद्धपातळीवर सुरू 

नाशिक : देवळाली कॅम्प येथील चौघे मित्र रविवारी (दि. १६) दुपारी पावसाळी पर्यटनाकरिता त्र्यंबकेश्वरजवळील काचुर्ली गावाजवळ राखीव वनाच्या हद्दीतील दुगारवाडी धबधब्याला गेले होते. दरीत उतरून धबधब्याजवळ जाण्याचा प्रयत्न करताना निमुळत्या वाटेवर चौघांपैकी एकाचा पाय घसरला व तो दुगारा नदीपात्रात बुडाला. अमित शर्मा (वय १७) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर वनविभागाचे पथक, पोलिसांचे पथक घटनास्थळी दुपारी पोहोचले. पावसाचा जोर वाढल्याने रविवारी संध्यकाळी शोधकार्य थांबविण्यात आले होते; सोमवारी पहाटेपासून पुन्हा युद्धपातळीवर शोधमोहीम दुगारा नदीपात्रात सुरू आहे; मात्र अद्याप दुपारी पावणेदोन वाजेपर्यंत अमित हाती लागलेला नाही, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे यांनी सांगितले. 

देवळाली कॅम्प सह्याद्रीनगरमधील रहिवासी असलेले चौघे मित्र रविवारच्या सुटीमुळे पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी त्र्यंबकेश्वरला गेले. त्यांनी दुगारवाडी धबधबा गाठला. धबधब्याकडे जाणारा वरचा रस्ता खुला असून तेथून पर्यटक सध्या कोसळणाऱ्या धबधब्याचा आनंद घेतात. रविवारी या ठिकाणी अन्य पर्यटकांचीही गर्दी होती; मात्र हे चौघेही त्या मुख्य रस्त्यावरून पुढे चालत दरीत उतरून गेल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश पवार यांनी दिली. धबधब्याजवळ उतरण्याची खालील वाट वनविभागाने काटेरी कुंपण घालून बंद केलेली होती; मात्र तरीही या चौघांनी ते कुंपण हटवून पुढे गेले, असे पवार यांनी सांगितले. कुंपण हटवून धबधब्याजवळ जाण्याचा अट्टहास यांच्यापैकी अमितच्या अंगलट आला. त्याचा पाय घसरल्याने तो पाण्यात बुडाला. ही घटना दुपारी चारच्या सुमारास घडली.

घटनेची माहिती मिळताच पवार हे त्यांचे वनरक्षकांचे पथक घेऊन घटनास्थळी गेले. तसेच त्र्यंबक पोलिसही यावेळी पाेहोचले. घटनेची माहिती त्र्यंबकेश्वर तहसीलदार तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे यांना कळविण्यात आली. सुमारे दीड तास वनकर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने दुगारा नदीपात्रात अमितचा शोध घेतला; मात्र तो आढळून आला नाही. संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर खूप वाढला व अंधारही पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. सोमवारी (दि. १७) पहाटे नाशिकमधून आपदा मित्र व भोसला ॲडव्हेंचर चमू शोधकार्यासाठी रवाना होणार असल्याची माहिती देशपांडे यांनी दिली.

गेल्या वर्षाची पुनरावृत्ती
मागील वर्षी दुगारवाडी धबधब्यात रात्रीच्या किर्रर्र अंधारात ७ आगॅस्ट रोजी संध्याकाळी २१ पर्यटक अडकून पडले होते. त्यांपैकी एकाचा पाय घसरल्याने तो नदीत बुडून मृत्युमुखी पडला होता. यावेळी वन, पोलिस व आपत्ती विभागाने तब्बल सहा तास बचावकार्य करत सर्वांना उर्वरित पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले होते. या वर्षी या घटनेची पुनरावृत्ती एक महिना अगोदरच झाल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Youth washed away in Dugarwadi Falls of Nashik; The search operation started on war footing from early morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक