चांदोरीला स्फोटात युवक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 12:50 AM2017-09-02T00:50:29+5:302017-09-02T00:50:29+5:30
चांदोरी येथील एका दुमजली इमारतीत शुक्रवारी सकाळी अचानक स्फोट होऊन एक युवक जखमी झाला. स्फोटाचे कारण समजू शकले नाही. या स्फोटात इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सायखेडा : चांदोरी येथील एका दुमजली इमारतीत शुक्रवारी सकाळी अचानक स्फोट होऊन एक युवक जखमी झाला. स्फोटाचे कारण समजू शकले नाही. या स्फोटात इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
चांदोरी येथे ग्रामपालिका कार्यालयाच्या बाजूला असलेल्या एक दुमजली घरात सकाळी गूढ स्फोट झाल्याने मोठा आवाज होऊन इमारतीचा मागील भाग कोसळला, तर पुढील भाग खिळखिळा झाला आहे. या अपघातात घरातील सचिन हा युवक किरकोळ जखमी झाला. पोलीसपाटील अनिल गडाख यांनी फोनद्वारे सदर घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच सायखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता हा स्फोट गॅसगळतीमुळे झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेच्या तंत्रज्ञांना पाचारण करण्यात आले असून, त्यानंतरच स्फोटाचे निश्चित कारण कळू शकेल, असे सांगण्यात आले.चांदोरी ग्रामपालिका कार्यालयाजवळ मारूती मंदिरासमोरील माणिकराव गायखे यांच्या दुमजली घरात गेल्या पंधरा वर्षांपासून वाल्मीक अण्णा सोनवणे हे भाडेतत्त्वावर राहत आहे. शुक्रवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरात अज्ञात वस्तूचा स्फोट झाला. या स्फोटात इमारतीचे मोठे नुकसान झाले . सकाळी सचिनने गॅसवर अंघोळीसाठी पाणी ठेवले होते. थोड्या वेळाने गॅसची नळी लीक झाल्याचे निदर्शनास आहे.
या प्रकरणी पोलीस उपविभागीय अधिकारी दीपक गिºहे व पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ए.आर.काळे, मनोज मुंडे अधिक तपास करीत आहेत.