युवकाच्या धाडसाने बगळ्याला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:55 AM2018-03-01T00:55:18+5:302018-03-01T00:55:18+5:30
संक्रांतीच्या कालावधीत पतंग शौकिनांच्या निष्काळजीमुळे मनुष्य व पशुपक्ष्यांच्या जिवावर अजूनही संक्रांत कायम असून, देवळा येथे गेल्या दोन दिवसांपासून पतंगाच्या मांजामध्ये अडकून पडलेल्या बगळ्याला मधुकर पानपाटील या पक्षिप्रेमी युवकाच्या धाडसामुळे जीवदान मिळाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
देवळा : संक्रांतीच्या कालावधीत पतंग शौकिनांच्या निष्काळजीमुळे मनुष्य व पशुपक्ष्यांच्या जिवावर अजूनही संक्रांत कायम असून, देवळा येथे गेल्या दोन दिवसांपासून पतंगाच्या मांजामध्ये अडकून पडलेल्या बगळ्याला मधुकर पानपाटील या पक्षिप्रेमी युवकाच्या धाडसामुळे जीवदान मिळाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. शहरातील जुन्या तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या वटवृक्षावर अनेक विविध पक्ष्यांचे आश्रयस्थान आहे. संक्रांतीच्या काळात पतंगबाजांच्या काटलेल्या पतंगाच्या मांजात गेल्या दोन दिवसांपासून झाडाच्या शेंड्यावर एक बगळा अडकलेला होता. स्वत:ची सुटका करण्यासाठी प्रयत्न करत असताना तो पूर्णपणे त्यात गुरफटला. त्यावेळी त्याचा आक्रोश ऐकून सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक संपत आहेर यांनी बारकाईने निरीक्षण केले असता बगळा मांजात अडकल्याचे त्यांच्या लक्षात आले. परंतु झाड साठ ते सत्तर फूट उंच असल्याने व शेंड्याची फांदी बारीक असल्याने कुणीही हिंमत करून बगळ्याला वाचविण्यासाठी पुढे येत नव्हते. त्यावेळी शहरातील मधुकर पानपाटील नावाच्या युवकाने जिवाची पर्वा न करता झाडावर चढून बगळ्याची मांजातून मुक्तता
केली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पक्षिप्रेमी नागरिकांनी टाळ्या वाजवून पानपाटील यांच्या धाडसाचे कौतुक केले.