रामवाडीत  पूर्ववैमनस्यातून युवकाचा धारदार शस्त्राने खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:51 AM2018-07-12T00:51:15+5:302018-07-12T00:51:33+5:30

रामवाडी परिसरात राहणाऱ्या युवकाचा पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी (दि़१०) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली़ किशोर रमेश नागरे (२६, रामनगर, पंचवटी) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून, घटनेनंतर मारेकरी दुचाकीवरून फरार झाले़ नागरेच्या खुनाचे कारण गुलदस्त्यात असले तरी पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़

Youth's murder weapon in Ramwadi pre-emptive murder | रामवाडीत  पूर्ववैमनस्यातून युवकाचा धारदार शस्त्राने खून

रामवाडीत  पूर्ववैमनस्यातून युवकाचा धारदार शस्त्राने खून

googlenewsNext

पंचवटी: रामवाडी परिसरात राहणाऱ्या युवकाचा पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी (दि़१०) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली़ किशोर रमेश नागरे (२६, रामनगर, पंचवटी) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून, घटनेनंतर मारेकरी दुचाकीवरून फरार झाले़ नागरेच्या खुनाचे कारण गुलदस्त्यात असले तरी पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़ महिनाभरात खुनाची ही दुसरी घटना असून, या घटनांमुळे पंचवटीत पुन्हा गँगवार सुरू झाल्याचे समोर आले आहे़ दरम्यान, या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़  मयत नागरेचा भाऊ सचिन नागरे याने पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास किशोर हा घरासमोरील मैदानात उभा होता.
यावेळी सचिन... सचिन असा जोरजोराने आवाज दिल्याने ते घराबाहेर गेले असता त्यांना घरासमोरील मोकळ्या मैदानावर तोंडाला रुमाल बांधलेले संशयित लहान भाऊ किशोरच्या मानेवर, पाठीवर व पायावर धारदार शस्त्राने वार करीत होते़ सचिन नागरे यांनी मैदानाकडे धाव घेतली असता संशयित दुचाकीवरून फरार झाले़ सचिन नागरे यांनी गंभीर जखमी झालेला लहान भाऊ किशोर यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले़  या घटनेची माहिती मिळाल्यावर गुन्हे व विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते, शांताराम पाटील, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, निरीक्षक दिनेश बर्डेकर हे घटनास्थळी दाखल झाले होते़ नागरे याचा खून कोणी व का केला याबाबतची माहिती समोर आली नसून पंचवटी पोलीस व गुन्हे शाखेने संशयितांच्या शोधासाठी पथके तयार केली आहेत.
नागरे हा जाधव खून प्रकरणातील साक्षीदार
सप्टेंबर २०१५ मध्ये ठक्कर बझार बसस्थानकाजवळील हॉटेल तुळजासमोर आर्थिक वादातून टोळक्याने रामवाडीतील गुणाजी जाधव याचा खून केल्याची घटना घडली होती़ टोळक्याच्या या मारहाणीत किशोर नागरे हादेखील गंभीर जखमी झाला तसेच या घटनेचा प्रमुख साक्षीदारही होता़ या प्रकरणी पोलिसांनी संशयित व्यंकटेश मोरे व परेश मोरे यांच्यासह नऊ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे़ जाधव खून खटल्यात प्रमुख साक्षीदार असल्याने किशोर नागरेचा खून केला का? याचा पोलीस तपास करीत आहेत़
पोलिसांपुढे आव्हान?
गत महिन्यात पेठरोडवर अनिल गुंजाळ या युवकावर धारदार शस्त्राने वार करून खून झाल्याची घटना घडली होती. या घटनेस महिना होत नाही तोच मंगळवारी (दि.१०) रात्री किशोर नागरे या युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली़ पंचवटी परिसरात गत काही दिवसांपासून खुनी हल्ले, मारहाण, वाहनांच्या काचा फोडणे, दहशत माजविणे असे प्रकार घडले असल्याने गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढल्याचे समोर आले आहे़ त्यामुळे वा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे़
टोळीयुद्धाची चिन्हे
गंगापूररोड परिसरातील एका हॉटेलमध्ये मोहन चांगले व त्याचा साथीदार दीपक सोनवणे यांच्या खुनाची घटना घडली़ यानंतर शहरात चांगले व पगारे या दोन टोळ्यांमध्ये संघर्ष होऊन शहरातील शांततेला धोका निर्माण झाला होता. यानंतर वर्षभरातच भीम पगारे याच्या खुनाची घटना घडली होती. चांगले खुनातील संशयितांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली़ यानंतर बदल्याच्या भावनेतून या टोळ्या सक्रिय असल्याच्या काही घटना घडल्या होत्या. गुणाजी जाधव खुनातील साक्षीदार असल्यानेच नागरेचा खून केल्याची चर्चा आहे़ दरम्यान, पोलिसांनी या घटनांची वेळीच दखल न घेतल्यास टोळीयुद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे़

Web Title: Youth's murder weapon in Ramwadi pre-emptive murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.